ठाणे : महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हास्तरावर महिला व बाल विकास भवनाची स्थापना करण्यात आली आहे. आज जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांच्या हस्ते या भवनाचे उद्घाटन करण्यात आले. विविध योजनांची माहिती एकाच कार्यालयातून मिळणार असून जिल्ह्याचे हे भवन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाच्या बाजूला, दुसरा मजला, सार्वजनिक बांधकाम आवार,स्टेशन रोड येथे आहे.
या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) डी. वाय.जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी( महिला व बाल विकास) संतोष भोसले, कार्यकारी अभियंता ( बांधकाम) नितीन पालवे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची कार्यालये एकाच धताखाली आणल्यास लाभार्थ्यांना लाभ घेणे सोईचे व्हावे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन नागरिकांना होणारी गैरसोय टाळता यावी या करिता हे भवन उभारण्यात आले आहे.येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली महिला व बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचा प्रत्येकी एक प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियमित कार्यालयीन वेळेत हे कार्यालय सुरू राहणार आहे. सर्व वयोगटातील महिलां, मुलींसाठी केंद्र, राज्य आणि जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय यंत्रणा राबवित असलेल्या योजनांची माहिती, योजनांसाठी अर्ज कसा करावा? कायदेशीर मार्गदर्शन, समुपदेशन या कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय भवनाच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात महिला विकास भवनाची स्थापना करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे १५ ऑगस्ट पासून जिल्हा परिषद आवारात या भवनाची स्थापना करण्यात आलेली आहे.