ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदारांपैकी ३० लाख ६२ हजार ५४४ मतदारांनी (४७.९१ टक्के) २१२ उमेदवारांना मतदान केले आहे. ठिकठिकाणच्या १८ मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी २४ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरू होईल. एक राऊंड पूर्ण होण्यासाठी तब्बल अर्धा तास लागणार आहे. यानुसार सर्वाधिक मुरबाड येथील मतमोजणी ३४ फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. तर उल्हासनगरला सर्वात कमी म्हणजे २० फेऱ्यांमध्येही मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील ३० लाख ६२ हजार ५४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १७ लाख ३२ हजार ९१२ पुरूषांसह १३ लाख २९ हजार ४८७ महिला आणि १४५ इतर मतदारांनी मतदान केले आहे. या २१२ उमेदवारांपैकी विजयी उमेदवार दुपारी २ वाजेच्या आत निश्चित होण्याची शक्यता आहे. मतदारसंघात झालेले एकूण मतदान, तेथील उमेदवार, एकूण ईव्हीएम आदींचा विचार करता एका राऊंडला जास्तीत जास्त अर्धा तास लागणार आहे. १८ विधानसभाच्या मतमोजणीपैकी सर्वात जास्त ३४ फेऱ्यामध्ये मुरबाड मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.यानुसार अन्यही १६ मतदारसंघात मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. तर उल्हासनगर मतदारसंघात सर्वात कमी २० फेऱ्यामध्ये मतमोजणी पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी १८ मतमोजणी केंद्रावर होणार आहे. या प्रत्येक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले आहे. त्यावर १२० कर्मचारी आहेत. यानुसार जिल्ह्यात एक हजार २०० कर्मचारी या १८ मतदान केंद्रांवर तैनात आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्याव्दारे अत्यंत पारदर्शीपणाने व अचूकतेने मतमोजणी करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसरी फेरीची मतमोजणी सुरू करण्याचे नियोजन आहे. सर्व प्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत.
या मतमोजणीसाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर एक केंद्रीय निरीक्षक असून जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवरील १८ केंद्रीय निरीक्षकांच्या नियंत्रणात मतमोजणी होणार आहेत. नऊ हजार पोलिस बंदोबस्तासह ११ एसआरपीएफ व सीआरपीएफच्या तुकड्या या मतमोजणी केंद्रांवर आहेत. मतमोजणी केंद्रावर अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.