- सुरेश लोखंडे
ठाणे : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील घरे, खरीप पिके व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ३९८ गावांच्या बाधितांचा समावेश आहे. यातील भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड आणि कल्याणमधील काही बाधितांना २० कोटी रुपये नुकसानभरपाईचे वाटप होणे अपेक्षित आहे. यापैकी १२ कोटी ६४ लाखांचे वाटप झाले. तर, उर्वरित बाधितांसह कल्याण तालुक्यातील सर्वाधिक बाधित कुटुंबीयांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यासाठी तब्बल १६ कोटी ७० लाखांची गरज आहे.
जिल्ह्यात २६ व २७ जुलै आणि ४ ते ६ आॅगस्टदरम्यान अतिवृष्टी व पूरस्थितीच्या संकटात शेकडो गावांतील हजारो रहिवासी सापडले होते. यामध्ये कल्याण तालुक्यातील सर्वाधिक २६ हजार १७६ रहिवाशांसह सरकारी जागेवरील तीन हजार ४०४ बाधित कुटुंबीयांचा समावेश आहे. याशिवाय, जिल्हाभरातील १७ हजार १४३ शेतकऱ्यांच्या सहा हजार ८५५ हेक्टर शेतजमिनी व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या नुकसानीसह बाधित कुटुंबीयांचे पंचनामे केले असता त्यानुसार भरपाईवाटप झाले. ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर व मुरबाड आदी तालुक्यांतील बाधितांना आतापर्यंत १२ कोटी ६४ लाखांचे वाटप झाले. कल्याण तालुक्यातील सर्वाधिक बाधित कुटुंबीयांपैकी काहींना १६ कोटी ३७ लाख ५० हजारांचे वाटप करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे कल्याण तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झाले आहे. या बाधितांसाठी सुमारे २८ कोटी रुपये नुकसानभरपाईचे वाटप करणे अपेक्षित आहे. सुमारे २६ हजार १७६ बाधितांचे पंचनामे झालेले असून सरकारी जागेवरील तीन हजार ४०४ बाधितांचे पंचनामे अपेक्षित आहेत. या बाधितांपैकी १२ हजार ८९९ पंचनाम्यानुसार संबंधित कुटुंबीयांना अनुदानाची रक्कम वाटप झाली आहे. अजून तब्बल १३ हजार २७७ बाधित कुटुंबीयांना अजून १६ कोटी ७० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची गरज आहे.
या रकमेच्या प्राप्तीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही नुकसानभरपाईची उर्वरित रक्कम प्राप्त झाली नाही. निवडणुकीच्या धामधुमीनंतर ती मिळण्याची अपेक्षा आहे.
सहा हजार ८५५ हेक्टरी शेतजमीनीचे नुकसान
जिल्ह्यातील जीवघेण्या अतिवृष्टीमुळे तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला. याच कालावधीत पाच हजार २०१ राहत्या घरांचे नुकसान झाले, तर १३९ गायी, म्हशी, शेळ्यामेंढ्यांचे नुकसान झाले. यात सर्वाधिक नुकसान कल्याण तालुक्यात २६ हजार १७६ कुटुंबीयांचे झाले आहे. त्यांचे पंचनामे होऊन बहुतांश १२ हजार ८९९ आपत्तीग्रस्तांना अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित बाधितांच्या अर्थसाहाय्यासाठी १६ कोटी ७० लाखांची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सुमारे सहा हजार ८५५ हेक्टरी शेतजमीन व त्यावरील खरीप पिकांचे नुकसान झाले. कल्याण तालुक्यातील ५५ गावांचा या नुकसानग्रस्तांमध्ये समावेश आहे. जिल्हाभरात ५८७.८० हेक्टर शेतजमिनीचे पुरामुळे नुकसान झाले.