लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय ११ मजली इमारतीच्या बांधकामाच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजूर दिली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी ग्रामविकास विभागाने ७३ कोटी २५ लाख ३७ हजार रुपये खर्चालाही प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे या भव्य इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा करणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन ठाणे जिल्हा परिषदेला न्याय दिल्यामुळे अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, चंद्रकांत पवार आदींकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले जात आहे.
या ठाणे जिल्हा परिषदेची मुख्य इमारत १९६५-६६ मध्ये उभारण्यात आली होती. मात्र, ती धोकादायक झाल्यामुळे पाडण्यात आली. त्यामुळे या जिल्हा परिषदेची १५ कार्यालये तीन ठिकाणी विखुरली आहेत. या सर्व कार्यालयासाठ स्वतंत्र इमारत असावी, यासाठी जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा सुरू होता. त्यास अनुसरून या इमारतीच्या जागेवर नवीन ११ मजली इमारत बांधण्यासह त्यासाठी ७३ कोटी २५ लाखांच्या खर्चालाही बुधवारी प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे आता या इमारतीच्या बांधकामाचा रखडलेला प्रश्न आता मार्गी लागल्याचे समाधान जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकारी वर्गाने व्यक्त केले.
या जिल्हा परिषदेच्या कार्यालयासाठी राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाची कळवा येथील जागा मंजूर केली होती. त्या जागेवर जिल्हा परिषद मुख्यालयासाठी भुमिपूजनही करण्यात आले होते. मात्र, कालांतराने ती जागा राज्य सरकारने रद्द केली. दरम्यान मुख्य प्रशासकीय इमारत धोकादायक होताच दिला पाडण्यात आले. त्यानंतर सर्व कार्यालये अन्यत्र विखुरलेली आहेत. या सर्व कार्यालयांना एकत्र आणून सध्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणीच जिल्हा परिषदेची भव्य इमारत उभारण्याचा आता हा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन पालकमंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या भव्य इमारतीसाठी पुढाकार घेतला. त्यांच्याकडून ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला जात होता. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यालय भव्य असावे, अशी शिंदे यांची भूमिका होती. त्यादृष्टीकोनातून पार्किंगला पुरेशा जागेसह ११ मजली इमारतीचा भव्य आराखडा तयार करण्यात आला आहे. यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील विकासाला वेग आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे मुख्यालयाचा प्रश्न मार्गी: सुभाष पवार
ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे अखेर मुख्यालयाच्या इमारतीला प्रशासकीय मान्यता मिळाली. यामुळे या इमारतीच्या बांधकामाला आता लवकरच सुरुवात होईल, आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांसह तत्कालीन सीईओ डाँ. भाऊसाहेब दांगडे आदींनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला असता या इमारतीच्या बांधकामचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावला. - सुभाष पवार, उपाध्यक्ष-जि.प. ठाणे