ठाणे : मंगळवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुन्हा सुरू केल्याने जिल्ह्याला अवघा ८३ हजार ८०० इतका लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. यामध्ये पाच हजार ३०० कोव्हॅक्सिन, तर ७८ हजार ५०० कोविशिल्ड लसींचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसून आले. बघता बघता एप्रिल महिन्यात या आजाराने रौद्ररूप धरण केले. त्यामुळे कोरोनाने बाधित होण्यापेक्षा लस घेऊन सुरक्षित होण्याकडे लहानांपासून ज्येष्ठ नगरिकांमध्ये चढाओढ सुरू आहे. असे असले तरी, शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे अनेकदा लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्याचे दिसून आले. त्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले होते. मात्र, अपुऱ्या साठ्यामुळे ते देखील शासनाकडून थांबविण्यात आले. मात्र, शासनाने पुन्हा १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला परवानगी दिली आहे.
सोमवारी ठाणे जिल्ह्यासाठी ८३ हजार ८०० इतका लसींचा साठा उपलब्ध झाल्याने पुन्हा वेगाने लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे.
लसीकरण माहिती
जिल्हा - कोव्हॅक्सिन - कोविशिल्ड
ग्रामीण - १११० - १५४००
कल्याण डोंबिवली - १००० - १५८००
उल्हासनगर - २६० - ३८००
भिवंडी - ३७० - ५४००
ठाणे मनपा - ११८० - १७७००
मिरा भाईंदर - ५८० - ८२००
नवी मुंबई - ८०० - १२०००
....................................................................................
एकूण - ५३०० - ७८५००