ठाणे : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे २७ व २८ ऑगस्ट रोजी प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हाती घेण्यात आले आहे. यानुसार जिल्ह्यातील गांवखेड्यात जिल्हा आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या समन्वयाने शुक्रवारपासून या लसीकरणास प्रारंभ करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील शाळा लवकर सुरू करायच्या आहेत. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यातील शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करणे आवश्यक आहे. त्यासाठी शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांच्या दरम्यान जिल्ह्यातील सर्व शासकीय कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केद्रांवर शासकीय आणि खाजगी शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी जारी केले आहे.
या लसीकरण मोहिमेदरम्यान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे शैक्षणिक विभागात कार्यरत असल्याचे कार्यालयीन ओळखपत्र लसीकरण केंद्रावर दाखवणे आवश्यक आहे. या ओळखपत्रावर तत्काळ लसीकरण करता येईल. याचा लाभ जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे, माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे, यांनी केले आहे.