ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्ट रोज ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच शनिवारी गेल्या १२ तासात म्हणजेच शनिवार रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत रुग्णालयात आणखी १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब समोर आले आहे. त्यात १० महिलांचा आणि ८ पुरुषांचा समावेश आहे. तसेच यात ४ वर्षीय मुलाचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासन पुन्हा टीकेची धनी ठरली आहे. दरम्यान, मृत पावलेल्यांमध्ये ४ वर्षे वयोगटापासून ते ८३ वर्षापर्यंत वयाच्या रुग्णांचा समावेश असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. काही रुग्ण वयोवृद्ध होते तर काही रुग्णांना खासगी रुग्णालयातून अतिशय अत्यवस्थ अवस्थेत असताना शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, असा दावा प्रशासनाने केला आहे.
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यु झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयबाहेर आक्रोश करून गोंधळ घातला होता. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही रुग्णालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारून संताप व्यक्त केला. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच रुग्णालयात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
शनिवार रात्री १०.३० ते रविवार सकाळी ८.३० या कालावधीत हे रुग्ण दगावले आहेत. त्यातील १३ रुग्णांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तर ५ रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. या वृत्तास रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे. काही रुग्ण खासगी रुग्णालयामधून अतिशय अत्यवस्थ अवस्थेत असताना शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल झाले होते तर, काही रुग्णांचे वय ८० पेक्षा जास्त असल्याने वयोवृद्ध असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे रुग्णांचा भार कळवा रुग्णालयावर वाढला आहे. ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत आहेत. त्या तुलनेत डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे रुग्णाच्या उपचाराचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.१ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान रुग्ण दाखलकळवा रुग्णालयात ज्या रुग्णांचा मृत्यु झाला आहे, त्यातील रुग्ण हे १ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान रुग्णालयात दाखल झाले होते. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यात ठाणे - ६, कल्याण - ४, भिवंडी -३ आणि उल्हासनगर, साकीनाका, गोवंडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
हे होते आजारजे रुग्ण दगावले त्यातील काही अपघातग्रस्त काहींनी अल्सर, लिव्हर खराब होणे, निमोनिया, विष प्राशन, डायलेसीस, डोक्याला मारहाण, युरीन इनफेक्शन, ऑक्सीजनची कमतरता, बीपी कमी होणे, ताप आदींमुळे मृत्यु झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.मृत्यु झालेल्यांमध्ये एका ४ वर्षीय मुलाचा समावेश असून त्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. तर इतर मृत्युमध्ये एका ८३ वर्षीय वृध्द महिलेसह ८१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर उर्वरीतांमध्ये ३३ ते ८३ वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे.