कल्याण : ठाणे-दिवादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वेमार्गांच्या कामासाठी आतापर्यंत रेल्वेने चारवेळा डेडलाइन दिल्या. त्या चारही डेडलाइन रेल्वेने पाळलेल्या नाहीत. या काळात प्रकल्पाचा खर्च १५० कोटींवरून ४०० कोटींवर पोहोचला. रेल्वे प्रवाशांच्या खिशांतून तिकिटापोटी मिळालेल्या उत्पन्नातून ही उधळपट्टी केली जात आहे. त्यामुळे डेडलाइन पाळून प्रकल्प कधी पूर्ण केला जाणार, असा संतप्त सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे.रेल्वे परिषदेचे आयोजन नुकतेच आमदार आशीष शेलार यांनी केले होते. या परिषदेच्या व्यासपीठावर उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष मनोहर शेलार यांनी हा गंभीर प्रश्न मांडला. पाचव्या व सहाव्या मार्गांचे काम जून २०१९ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते. या मार्गावर सुरू असलेल्या कामाची पाहणीही खासदारांनी केली होती. त्यानंतर, याच मार्गांवरील कामाचा काही भाग खचल्याने कामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.खचलेल्या भागाचीदेखील खासदारांनी पाहणी केली होती. त्यानंतरही प्रकल्पाच्या कामात गती नसल्याने प्रवासी महासंघाच्या वतीने हा सवाल परिषदेसमोर केला. रेल्वे व रेल्वे विकास परिषदेच्या कामाविषयी महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाण्याच्या पुढे कर्जत व कसाऱ्याच्या दिशेने प्रवासी संख्या वाढली आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांचा बळी जात आहे. रेल्वे प्रशासनाला याचेदेखील गांभीर्य नसल्याचे यातून उघड होत आहे. पाचव्या व सहाव्या मार्गांचे काम लवकर मार्गी लावून गर्दीच्या प्रवासातून प्रवाशांची सुटका करावी. कळवा ते ऐरोली या थेट मार्गाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी देऊन त्यासाठी रेल्वेच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी. कल्याण-कसारा या ७०० कोटींच्या तिसºया मार्गाचे काम रेल्वेकडून हाती घेतले गेले आहे. ते मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. त्याच धर्तीवर कल्याण-कर्जत मार्गावर तिसºया मार्गाच्या कामाला मंजुरी द्यावी. त्याचे काम पहिल्या टप्प्यात कल्याण-अंबरनाथ व पुढे वांगणीपर्यंत प्रथम करण्यात यावे. मुंबई ते कल्याण महिला विशेष लोकल गाडी चालवली जाते. बदलापूर व आसनगावसाठी महिला विशेष लोकल सुरू करावी. कर्जत-पनवेल दुहेरी मार्गाच्या कामाला प्राधान्य द्यावे. ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा मार्गावरील गाड्यांच्या फेºया वाढवण्यात याव्यात, आदी मागण्या परिषदेत मांडण्यात आल्या. त्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना दिले जाणार असल्याची माहिती यावेळी शेलार यांनी दिली. प्रकल्प लवकर मार्गी लावून प्रवाशांना दिलासा देण्यात यावा, असे सांगण्यात आले.रेल्वे परिषदेने मानले ‘लोकमत’चे आभाररेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना यापूर्वी चार लाखांची मदत दिली जात होती. ती दुप्पट करून आठ लाख रुपये करण्यात आली. मात्र, दावे निकाली निघण्याचे प्रमाण कमी होते. लोकमतने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर चित्र बदलले.दावा प्राधिकरणास दोन न्यायाधीश देण्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर मशीद येथे नवीन अपघात दावा प्राधिकरण सुरू केले जाणार आहे. याबद्दल रेल्वे परिषदेने ‘लोकमत’चे आभार मानले.
ठाणे-दिवा मार्ग : पाचव्या, सहाव्या मार्गांचा खर्च ४०० कोटींवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 3:52 AM