सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यास लागून असलेल्या गजुरात, राजस्थान राज्यात वर्षेभरापासून असलेल्या ‘लंपी’ या जनावरांच्या जीव घेण्या आजाराने आता ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यात पाय पसरले आहेत. या तीन तालुक्यातील संशयीत जनावरांचे ब्लड सॅम्पल भोपाळ येथील लॅबमध्ये पाठवले असता ते पॉजिटीव असल्याचे सोमवारी आढळून आले. या जनावरांना वाचवण्यासाठी आता पशूधन विभागाची धावाधाव सूरू झाली आहे. लागण झालेले व त्यांच्या सहवासातील जनावरांच्या लसीकरणासाठी पशूसंर्धन विभागाच्या आयुक्तांनी ठाणे जिल्ह्यात धाव घेऊन लसीकरण युध्दपातळीवर हाती घेतले आहे.
आधीच पावसाच्या माऱ्याने घायाळ झालेल्या बळीराजाच्या पशूधनाला वाचवण्याचा बाका प्रसंग ठाणे जिल्ह्यावरही आता ओढावला आहे. लंपी हा जनावरांचा जीव घेणाºया आजाराने आता जिल्ह्यातील गांवपाड्यात पाय पसरले आहेत. शहापूर येथील तीन जनावरांचे सॅम्पल भोपाल येथील लॅबमधून तापासले असता त्यात ते लंपीच्या आजाराचे पॉजिटीव असल्याचे निश्चित झाले. याप्रमाणेच अंबरनाथमधील एक आणि भिवंडी तालुक्यातील दोन जनावरांचे ब्लड सॅम्पल लंपी आजाराचे पॉजिटीव म्हणून निश्चित केले आहेत. त्यास अनुसरून या जनावरांच्या आसपासच्या पाच किमी.च्या गावातील जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरणाचे काम सोमवारपासून हाती घेतल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या पशूधन विभागाचे एडीएचओ डॉ. समीर तोडनकर, यांनी लोकमतला सांगितले.
जिल्ह्यातील काही जनावरांचा अचानक मृत्यू झाल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने गांभीर्याने घेऊन या जनावरांचे ब्लड सॅम्पल भोपाळ येथील लॅबमध्ये पाठवून खात्री करून घेतली आहे. त्यामुळे शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथच्या उसाटने व बदलापूरच्या रमेश वाडी येथील दोन जनावरांच्या पाच किलोमीटर अंतरावरील सर्व जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण हाती घेतले आहेत. यासाठी सध्या जिल्हा परिषदेने स्वनिधीतून दहा हजार लसीकरणाचा बंदोबस्त केलेला आहे. त्यातून जिल्ह्यातील या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे.
या दहा हजारांसह जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून पुन्हा दहा हजार लसच्या कुपी मिळणार आहे. याशिवाय आणखी दहा हजार लसच्या कुपीची मागणी नोंद करण्यात आल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेकडे आता ३० हजार लसेस या लंपीच्या बिमोडसाठी उपलब्ध होणार असल्याच्या वृत्तास डॉ. तोडनकर यांनी दुजोरा दिला आहे.