ठाणे : शहरातील घाणेकर नाट्यगृहात भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’ नाटकाचा प्रयोग शनिवारी दुपारी सुरू होता. या प्रयोगादरम्यान एसी बंद पडल्याने कलाकारांची मोठी गैरसोय झाली. पावसाने विश्रांती घेतल्याने अगोदरच उकाडा वाढला आहे. त्यात, भरत जाधव यांनी आपली व्यथा फेसबुक व्हिडीओच्या माध्यमातून मांडली आणि त्यांचा व्हिडीओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, लगेच कलाकारांसह ठाणेकरांनीही घाणेकरमधील असुविधांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनी या व्हिडीओचे समर्थन करीत, एवढ्या मोठ्या कलाकाराला अशा पद्धतीने नाट्यगृहाची व्यथा मांडावी लागते, हे चुकीचे असून याची दखल पालिकेने घ्यावी, अशी मते मांडली होती.
घाणेकर सभागृहातील या नाट्यप्रयोगावेळी घडलेल्या प्रकाराची आणि भरत जाधवच्या व्हिडीओची ठाणे मनसेकडून दखल घेण्यात आली. याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी महापालिका अधिकारी समीर उन्हाळे यांच्याकडे 'एसी बंद करून' चर्चा केली. तसेच संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणीही मनसेने केली. पालिका नको त्या गोष्टीवर कोट्यवधी रुपये करते. परंतु, ज्याची ठाणेकरांना गरज आहे, त्याच्यावर पालिका का खर्च करीत नाही? असा सवालही अविनाश जाधव यांनी उपस्थित केला. तर, पालिकेच्या बजेटवर शिवसेना हात साफ करतेय असा आरोपही जाधव यांनी यावेळी केला.
दरम्यान, यापूर्वीही नाट्यगृह बंद असणे, तसेच मिनी थिएटर्सच्या समस्यांबाबत ठाण्यातील कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. तर, प्रशासनाकडे या नाट्यगृहासंदर्भात तक्रारीही केल्या होत्या. मात्र, महापालिकेचं दुर्लक्ष कायम असल्याने भरत जाधवने मनस्ताप व्यक्त केला. त्यानंतर, मनसेनं शिवसेनेला धारेवर धरत महापालिका अधिकाऱ्यास मनसेस्टाईल सुनावले.