-अजित मांडके ठाणे - ठाणे महापालिकेत विविध विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या तब्बल २५ चालकांची दिवाळी गोड झाली आहे. चालक असलेले कर्मचारी आता लिपीक झाले आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकीकडे पालिकेतील कर्मचारी सेवा निवृत्त होत असतांना पालिकेत पोकळी निर्माण झाली आहे. या लिपीकांना आता महापालिकेच्या माध्यमातून ट्रेनिंग दिले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
ठाणे महापालिकेच्या सेवेत २०१६ च्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत चालक म्हणून कर्मचारी कामावर रुजु झाले होते. त्यातील २५ चालकांना आता पद्दोन्नती मिळाली आहे. सोमवारी ही पद्दोन्नती देण्यात आली. त्यामुळे आपण घेतलेल्या शिक्षण आता खºया अर्थाने सार्थकी लागल्याची भावना या कर्मचाºयांमध्ये दिसत आहे. त्यातही यातील काही चालक हे बीए. पासून ते एमकॉम, एलएलबी आदींसह उच्चशिक्षक आहेत. मात्र शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळत नसल्याने त्यांनी आलेल्या संधीचा फायदा घेत महापालिकेच्या सेवेत सामील झाले होते. परंतु काम करतांना त्यांनी कोणत्याही प्रकारची लाज बाळगली नसल्याचे पालिकेतील एका वरीष्ठ अधिकाºयाने सांगितले. अखेर त्यांच्या शिक्षणाला न्याय आता मिळाला आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता खºया अर्थाने या चालकांना महापालिकेत मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.
विविध आस्थापनेवरील हे २५ चालक आता लिपीक झाल्याने त्यांना आता त्याचे प्रशिक्षण महापालिकेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. येत्या काही दिवसात ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ते लिपीक म्हणून महापालिकेत काम पाहणार आहेत. तसेच या पद्दोन्नतीमुळे त्यांना पुढे जाण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.
या २५ जणांना पद्दोन्नती मिळाल्याने चालकांच्या जागा आता रिक्त झाल्या आहेत. त्या जागा कशा भरायच्या असा पेच पालिकेला सतावू लागला आहे. परंतु आता त्या जागा कंत्राटी स्वरुपात भरण्यासाठी महापालिकेने पावले उचलली असल्याची माहिती पालिकेने दिली.