- अजित मांडकेठाणे - शहरात मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे महापालिका हद्दीसह इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याने त्याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी सलग तिस-या दिवशी देखील वाहतुक कोंडीचा फटका बसल्याचे दिसून आले. गुरूवारी सकाळपासूनच पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पूल ते माजीवडा आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पूर्व द्रुतगती महामार्गावर टेम्पो बंद पडल्याने तर खारेगाव टोलनाका येथे खड्डे भरणीमुळे मुंब्रा बायपास मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीचा फटका भाजपचे धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना देखील बसल्याचे दिसून आले.
मागील काही दिवसापासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने शहराच्या विविध भागात रस्त्यांना खड्डे पडले आहेत. किंवा आधीपेक्षा खडय़ांची संख्या वाढली आहे. तसेच खडय़ांचा आकारही मोठा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. पूर्व द्रुतगती मार्गावरून ठाणे, भिवंडी, कल्याण येथून हजारो वाहने मुंबईच्या दिशेने वाहतूक करतात. या मार्गिकेवर सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास कोपरी रेल्वे पूलावर एक टेम्पो बंद पडला. त्यामुळे कोपरी रेल्वे पूल ते माजीवडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सकाळी कामानिमित्ताने मुंबईत निघालेल्या वाहन चालकांचे यामुळे हाल झाल्याचे दिसून आले. तर खारेगाव टोलनाका येथे खड्डे भरणीच्या कामांमुळे मुंब्रा बायपास मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खारेगाव टोलनाका ते मुंब्रा बायपास मार्ग, वाय जंक्शन पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यात दुपारी या कोंडीचा फटका धुळ्याचे भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना देखील बसल्याचे दिसून आले. ते देखील ज्युपीटर रुग्णालयासमोरील हायवेवर अडकल्याचे दिसून आले.