- प्रज्ञा म्हात्रे ठाणे - जुन्या काळातील आणि माझ्यापेक्षा चार वर्षांनी सिनिअर असलेले जयंत सावरकर, उर्फ आमचा अण्णा आज सोडून गेला. आमच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी दिवस आहे. नाटकाला वाहून घेतलेले ते नट होते, नाटक हेच त्यांचे आयुष्य होते, नाटक हेच त्याचे जगणे होते. अत्यंत उत्साही होते. सिनेमा, मालिका त्यांनी केल्या पण त्यात त्यांना आनंद मिळाला हे मला माहित नाही पण नाटकांमध्ये त्यांना प्रचंड आनंद मिळत. मी एकदा अनुभव घेतला आहे, दुरितांचे तिमीर जाओ हे नाटक आम्ही करत असताना किरण भोगले यांना पुण्याहून यायला उशीर झाला आणि भालचंद्र पेंढारकर अस्वस्थ झाले होते आणि अशा वेळेला जयंत मला जाताना दिसले, त्यांना मी हाक मारली आणि एका मिनिटांत ते नाटकासाठी उभे राहीले. सगळ्यांसाठी धावून जाणारे आणि कुठेही कोणतेही काम करणारे सावरकर हे आज काळाच्या पडद्याआड गेले तरी त्यांची आठवण कायम राहील अशा भावना ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांनी व्यक्त केल्या.
ठाणे : जयंत सावरकर हे रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील अतिशय अष्टपैलू व्यक्तीमत्त्व होते. तमाम सिनेसृष्टीतील रंगकर्मी त्यांचा आदर करत. ते ठाण्यात राहत असल्याने याचा ठाणेकरांना अभिमान होता. काही महिन्यांपुर्वी गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत माझी भेट झाली होती. त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचा संवाद हा प्रेरणादायी ठरला होता. रंगभूमीमधला हाडाचा कलाकार हरपला याच्या वेदना आहेत.- संजय केळकर, आमदार