ठाणे - कोरोनाचा कहर कमी होत असला तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे ठाणे, मुंबईतील शाळा तर सुरू झालेल्या नाहीत. मात्र, शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत ठाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढलेले असून, त्यानुसार १ ली ते ९ वीच्या आणि ११ वीच्या ५० टक्के शिक्षकांनी उपस्थित रहावे. तर, १० वी आणि १२ वीच्या १०० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे स्पष्ट केलेले आहे.
राज्यभरातील विविध जिल्हे, शहरे ही कोरोना निर्बंधांच्या विविध टप्प्यांत येतात. त्यामुळे सगळीकडचे शहरे अनलॉक होण्याचे नियम वेगळे. राज्यभरातील शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या. शाळांत शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांनी एक पत्र काढले. तर, जिल्हानिहाय शिक्षणाधिकाऱ्यांनीही वेगळी पत्रके काढली, त्यामुळे राज्यात काही ठिकाणच्या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, ठाण्यातही शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेच्या १ ली ते ९ वीच्या आणि इयत्ता ११ वीच्या शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. तर, १० वी आणि १२ वीच्या शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. त्यामुळे ठाण्यातील शिक्षकांमध्ये या पत्रांवरून फारसा संभ्रम दिसला नाही.
----------------
शिक्षण संचालकांचे पत्र काय?
शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची शाळेत ५० टक्के उपस्थिती असेल. तर, १० वी आणि १२ वीचे काम पाहणारे शिक्षक यांना १०० टक्के उपस्थिती राहील. प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचीही उपस्थिती १०० टक्के असेल.
-------------
ठाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र
ठाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रानुसारही त्यांनी पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना शाळेत ५० टक्के तर १० वी, १२ वीचे काम पाहणारे शिक्षक यांना १०० टक्के उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तर, मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनाही १०० टक्के उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
------------
आम्हाला शाळेत उपस्थित राहण्याबाबत कोणतीही अडचण नाही. संचालकांच्या पत्रानुसारच शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र असल्याने संभ्रम नव्हता. फक्त प्रवास करणे अवघड जाते, असे काही शिक्षकांनी सांगितले.
-----------
शाळेत उपस्थितीबाबतच्या पत्रांचा गोंधळ ठाण्यात नव्हता. मात्र, काही शाळांमध्ये वरिष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापकपदाचा अतिरिक्त कार्यभारही आहे. मग अशा शिक्षकांना शिक्षक म्हणून की मुख्याध्यापक म्हणून उपस्थितीचा नियम लागू आहे, याबाबत संभ्रम आहे, अशी माहिती एका वरिष्ठ आणि सध्या मुख्याध्यापकपदाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या शिक्षिकेने दिली.
--------------
आपणही पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना शाळेत ५० टक्के तर १० वी, १२ वीचे काम पाहणाऱ्या शिक्षकांना १०० टक्के उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. बाकी इतर ठिकाणी झालेल्या गोंधळाबाबत मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही.
- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), ठाणे जिल्हा