ठाणे : केंद्र शासनाने बंधनकारक केलेल्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’(पीएमके) योजनेसाठी उत्कृष्ठ कामकाज केल्यामुळे राज्यात ठाणे व पुणे जिल्हा अव्वल ठरला आहे. या जिल्ह्यातील दोन शेतकरी लाभार्थी दांपत्यांना दिल्ली येथील १५ ऑगस्टच्या समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून केंद्र सरकारे आमंत्रित केले आहे. हा विशेष अतिथीचा सन्मान ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यामधील विजय गोटीराम ठाकरे व त्यांच्या पत्नी संगीता ठाकरे या दांपत्यास मिळाला आहे. या दांपत्यास ठाणे जिल्हा प्रशासनाकडून देश स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी सांगता समारंभाला लाल किल्यावर उपस्थित करण्यात आले आहे.
पुणे येथील राज्य शासनाच्या कृषि विभागामधील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषि आयुक्तालयाने ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून या शेतकरी ठाकरे दांपत्याची माहिती घेऊन केंद्र शासनाला आधीच कळवली आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बुधवारी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन समारंभाचे साक्षीदार होता आले आहे. त्यासाठी राज्याभरातून जाणाऱ्या दोन दांपत्यांमध्ये मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावातील या ठाकरे दांपत्याचा समावेश आहे. दिल्लीच्या या समारंभाला घेऊन जाण्यासह त्यांना सुखरूप घरी आणण्याची जबाबदारी मुरबाडच्या न्याहाडी येथील मंडल अधिकारी भोजू पवार व जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक विशाल सुनील जाधव यांच्याकडून पार पाडली जात आहे.
दिल्लीच्या लाल किल्लयावरील स्वातंत्र्या दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या या सांगता समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी या ठाकरे दांपत्यास घेऊन शासकीय यंत्रणा रेल्वेव्दारे सोमवारी सकाळीच दिल्लीत दाखल झाली आहे. देशातील प्रत्येक राज्यातून दोन शेतकरी लाभार्थी पत्नीसह विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात राज्यातून ठाणे व पुणे येथील शेतकरी दांपत्यास या विशेष अतिथी होण्याचा सन्मान मिळाला आहे. केंद्र शासनाने बंधनकारक केलेल्या पी.एम. किसान योजनेच्या लाभाथीर्ची भूमि अभिलेखनुसार माहिती अद्ययावत करण्याच्या कार्यवाहीत राज्यात ठाणे व पुणे जिल्ह्याने उत्कृष्ठ कामकाज केले आहे. त्यास अनुसरून ठाणे जिल्हह्यातील आदिवासी दुर्गम तालुक्यामधील या वैशाखरे गावामधील ठाकरे दांपत्याला स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे कामकाज महत्वाचे ठरले आहे.