- अजित मांडके
ठाणे : सलग दोन दिवस वा-याने शहरात पडझड सुरु असतांना मंगळवारी मात्र अखेर पावसाने सांयकाळच्या सुमारास दमदार हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटेच हा पाऊस बरसला असला तरी देखील वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर कामावरुन घरी जाणाºया चाकरमान्यांची मात्र या पावसाने चांगलीच तारांबळ उडविल्याचे दिसून आले. तर मंगळवारी देखील शहरात झाडांच्या फांद्या तुटण्याच्या घटना सुरुच असल्याचे दिसून आले.
मागील दोन दिवस शहरात पाऊस पडेल अशी शक्यता होती. परंतु दोन दिवस वाºयामुळे ठाणेकर हैराण झाले होते. कुठे वृक्ष पडणे, तर कुठे वृक्षाच्या फांद्या पडणे, पत्रे पडणे अशा काही घटना घडत होत्या. मंगळवारी देखील वाºयाचा वेग ठाण्यात दिसून आला. दिवसभर कधी उन्ह तर कधी ढगाळ वातावरण दिसत होते. त्यामुळे आज तरी पाऊस नक्की हजेरी लावेल अशी आशा ठाणेकरांना वाटत होती. अखेर सांयकाळी सव्वा सातच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी बरसल्या अवघे काही मिनिटे पावसाने हजेरी लावली. परंतु त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. कामावरुन घरी जाणा-या चारकमान्यांना मात्र पावसात भिजूनच जावे लागण्याची वेळ आली.
दुसरीकडे मंगळवारी देखील वारा दिवसभर सुरुच होता. त्यामुळे वृक्षाच्या फांद्या पडल्याच्या घटना शहरात घडल्या. मंगळवारी दुपारपर्यंत एकही झाड कोसळले नव्हते. पण झाडाच्या फांद्या तुटून पडल्याच्या दोन घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पांचपाखाडी, या ठिकाणी नाशिक-मुंबई रोडवरती झाडाची फांदी पडली. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसली तरी त्या रोड वरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. मात्र ती फांदी बाजूला केल्यावर वाहतूक सुरळीत झाली. तसेच साडेअकरा पावणे बाराच्या सुमारास टिकुजीनी वाडी, मानपाडा,या ठिकाणी झाडाची फांदी पडली. ती फांदी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने बाजूला करण्यात आली आहे. यामध्येही कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.