लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ढोकाळी नाका, कोलशेत रोड येथील हायलँड पार्क, बिल्डिंग नंबर - ९ मधील तळ मजल्यावरती असलेल्या टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडच्या इन्व्हर्टर रूम मध्ये आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास समोर आली. यावेळी, बाळकुम अग्निशमन केंद्राचे फायरमन सुधीर दराडे यांच्या उजव्या हाताच्या बोटाला काच लागून ते जखमी झाल्याची आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
हायलँड पार्क, बिल्डिंग नंबर - ९ मधील तळ मजल्यावरील बँकेच्या इन्व्हर्टर रूममध्ये आग लागल्याची बाब पुढे येताच, बँक कर्मचारी, महावितरण कर्मचारी, कापूरबावडी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या आगीवर अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी नियंत्रण मिळविले. मात्र या घटनेमध्ये बाळकुम अग्निशमन केंद्राचे फायरमन सुधीर दराडे यांच्या उजव्या हाताच्या बोटाला काच लागल्याने दुखापत झाली, त्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाासाठी दाखल केले, काच लागल्याने दराडे यांच्या बोटाला तीन टाके टाकण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी सांगितले.