मुंबई : एमएमआरमधील रिअल इस्टेट बाजारपेठेतील सकारात्मक कल एमएमआर हाउसिंग रिपोर्टमध्ये दिसून आला असून, या अहवालानुसार रिअल इस्टेट वार्षिक विक्रीच्या बाबतीत गेल्या चार वर्षांच्या (२०१७-२०२०) तुलनेने २०२१ (जानेवारी-डिसेंबर २०२१) हे वर्ष सर्वोत्तम असण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
एमएमआरमधील एकूण सदनिकांच्या विक्रीचा आकडा १,७१,१६५ इतका आहे. ऑगस्ट २०२१ पर्यंत त्याचे मूल्य १,३३,०१५ कोटी रुपये इतके आहे. हा कल पुढे सुरू राहून २०२१ हे विक्रम मोडणारे वर्ष ठरणार आहे, असा दावा केला जात आहे. गेल्या ५ वर्षांत ठाणे जिल्ह्यामध्ये घरांच्या किमतीत चढा कल दिसून आला. मुंबईच्या तुलनेने ठाणे ही परवडण्याजोगी बाजारपेठ आहे. गेल्या ५ वर्षांची तुलना करता येथील घराची किंमतदेखील वाढत आहे.
एमएमआर हाउसिंग रिपोर्ट २०२१ हा नवीन अहवाल क्रेडाई एमसीएचआयने सीआरई मेट्रिक्सच्या सहयोगाने प्रकाशित केला आहे. त्यानुसार, क्रेडाई - एमसीएचआयचे अध्यक्ष दीपक गोराडिया म्हणाले, स्टँप ड्यूटीमधील कपात, गृह कर्जाच्या दरांमधील घट, विकासकांकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या वित्त व इतर ऑफर्स आणि महामारीचा परिणाम म्हणून स्वतःचे घर असण्याला मिळालेले महत्त्व यामुळे हा कल दिसून येत आहे. जवळपास अर्ध्या दशकभर सपाट स्वरूपाची वाढ अनुभवास आल्यावर पहिल्यांदा या क्षेत्रात तेजी दिसून येत आहे आणि सध्याचा उत्सवी हंगाम पाहता या वर्षाच्या अखेरपर्यंत हा कल असाच राहील.
जानेवारी ऑगस्ट २०२१ या कालावधीतील विक्री ही २०१७, २०१८, २०१९ आणि २०२० या चारही वर्षांमधील विक्रीपेक्षा जास्त आहे.मूल्याचा विचार करता सुमारे ८० टक्के घरविक्री ही १ कोटीहून अधिक किंमत असलेल्या अपार्टमेंट्सची झाली. पश्चिम उपनगर हे मुंबईचे सर्वात मोठे मॅक्रो-मार्केट आहे. जानेवारी - ऑगस्ट २०२१ या कालावधीतील विक्री २०१७, २०१९ आणि २०२० या चारही वर्षांच्या विक्रीपेक्षा जास्त आहे.