ठाणे: नोकरीला लागून चार महिने उलटूनही दोन महिला कर्मचा-यांना वेतन न देणा-या कंपनी मालकाविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. याचा पाठपुरावा पोलिसांनी केल्यानंतर या दोन्ही कर्मचा-यांचे एक लाख २० हजार रुपये मॅट्रीक्स ट्रेनिंग अॅन्ड इन्शुरन्स या कंपनीने परत केल्यामुळे या महिला कर्मचा-यांनी पोलिसांचे गुरुवारी आभार मानले आहेत. एलआयसीच्या प्रतिनिधींना (एजंट) प्रशिक्षण देण्याचे काम ठाण्याच्या या मॅट्रीक्स ट्रेनिंग अॅन्ड इन्शुरन्स कंपनीतर्फे केले जाते. याच कामासाठी चेंबूरची सुचिता करकेरा (३४) आणि कल्याणची सुप्रिया आंबेकर या कंपनीत २५ हजार रुपये प्रति महिना वेतनाने नोकरीला लागल्या. आॅक्टोंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत त्यांनी या कंपनीत काम केले. सुरुवातीचा त्यांना पगारही मिळाला. पुढे मात्र पगार मिळत नसल्याने त्यांनी ही नोकरी सोडली. कंपनी दिवाळखोरीत असल्याने आपण उर्वरित पगार देऊ शकत नसल्याचे कंपनीचे मालक आनंद राव यांनी या दोघींनाही सुनावले. अखेर त्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात एप्रिल २०१८ मध्ये तक्रार अर्ज केला. याच अर्जाची दखल घेऊन पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी आनंद राव यांच्याकडे पाठपुरावा केला. तेंव्हा राव यांनी ३ मे रोजी वेतनाची संपूर्ण रक्कम धनादेशाद्वारे पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही महिला कर्मचा-यांना सुपूर्द केली. पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे वेतनाची एक लाख २० हजारांची रक्कम या दोघींनाही मिळाल्यामुळे जिजाऊ ब्रिगेडच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा सपना जाधव, महिला कर्मचारी सुचिता करकेरा आणि सुप्रिया आंबेकर यांनी नौपाडा पोलिसांचे विशेष आभार मानले.
ठाणे: नौपाडा पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे महिला कर्मचा-यांच्या वेतनाची रक्कम मिळाली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 9:30 PM
महिला कर्मचा-यांचे वेतन देण्यास टाळाटाळ करणा-या कंपनीकडे नौपाडा पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दोघींच्याही वेतनाची एक लाख २० हजारांची रक्कम कंपनीने पोलिसांच्या मार्फतीने त्यांना सुपूर्द केली.
ठळक मुद्देचार महिन्यांच्या वेतनाची थकबाकीदिवाळखोरीच्या कारणाने केली होती टाळाटाळधनादेश मिळताच पोलिसांचे मानले आभार