मीरारोड - बनावट कागदपत्रांच्या आधारे नागालँड , अरुणाचल प्रदेश येथे अस्तित्वात नसलेल्या वाहनांची नोंदणी करायची व नंतर त्यानुसार वाहने चोरून त्याची महाराष्ट्रात पुन्हा नोंदणी करून विकणाऱ्या चौघांना मीरा भाईंदर - वसई विरार गुन्हे शाखा १ च्या पथकाने अटक केली आहे . आरोपीं कडून ७ कोटी ३२ लाखांची एकूण ४७ वाहने जप्त केली असून राज्यासह राजस्थान , उत्तरप्रदेश येथील वाहन चोरीचे १६ गुन्हे आणले उघडकीस आणल्याची माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी सोमवारी दिली.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गेली ३ - ४ वर्षात उघडकीस न आलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास मीरा भाईंदर गुन्हे शाखा युनिट १ ला तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते , पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी दिले होते . तेव्हा पासून पोलिसांनी व्होरीची वाहने व बनावट कागदपत्रांच्या द्वारे नोंदणी आदी प्रकारचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलीस आयुक्त मधुकर पांडेय , अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक व गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सुर्वे व कैलास टोकले सह राजु तांबे, संदीप शिंदे, अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, सचिन हुले, सचिन सावंत, विजय गायकवाड, समिर यादव, सुधीर खोत, विकास राजपुत, प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी यांच्या पथकाने चालवला होता.
फेब्रुवारी २०२१ मध्ये काशीमीरा भागातून ट्रक चोरीचा गुन्हा तर जुलै २०२१ मध्ये वालीव पोलीस ठाण्यात टेम्पो चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता . प्रशांत गांगुर्डे यांना मिळालेल्या माहिती नुसार पोलीस पथकाने तपास करत या प्रकरणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गॅरेज चालवणारा अजहर शेख (३५ ) रा. धारखेड व समीर नसीर खान (४१ ) रा. खंडाळा, ता . वैजापूर ; अमरावतीच्या वलगाव रोड येथील गाडी खरेदी विक्री करणारा मोहम्मद शकील शाह (४८ ) व नांदेडचा शेख नशीर शहजादमिया (४३ ) ह्या चौघांना पोलिसांनी अटक केली होती.
तपासात आरोपीं कडून पोलिसांनी १४ टाटा ट्रक, १० हायवा टिपर , ८ आयशर टेम्पो , ९ अशोक लेलैंड ट्रक व टेम्पो व प्रत्येकी १ मारुती आर्टिगा, वॅगनार, स्विफ्ट डिझायर, इनोव्हा , क्रुझर , महीन्द्रा जितो अश्या चोरलेल्या ४७ गाड्या हस्तगत केल्या . ७ कोटी ३२ लाख ४१ हजार अशी एकूण किंमत ह्या गाड्यांची आहे . मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालया सह मुंबई , छत्रपती संभाजी नगर, पिंपरी चिंचवड, बीड, पुणे, लातूर, जळगाव, अहमदनगर, रायगड तसेच राजस्थान आणि उत्तरप्रदेश भागातून आरोपींनी केलेले वाहन चोरीचे १६ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.
आरोपी हे गाड्या अस्तित्वात नसताना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे गाड्या नागालँड , अरुणाचल प्रदेश राज्यातील आर.टी.ओ. कार्यालयामध्ये गाड्यांची नोंदणी करून घ्यायचे . नोंदणी क्रमांक व आवश्यक कागदपत्रे मिळवून नंतर त्या कागदपत्रांवर नमुद असलेल्या मेक आणि मॉडेल प्रमाणे वेगवेगळया राज्यांतुन गाड्या चोरी करायचे.
चोरलेल्या गाड्यांचे मुळ इंजिन नंबर, चेसिस नंबर खोडुन त्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या कागदपत्रांवरील इंजिन, चेसिस नंबर टाकून घ्यायचे . त्या गाड्या महाराष्ट्रातील आर.टी.ओ. मध्ये नोंदणी करून विकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली . सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक संदिप शिंदे व पोलीस हवालदार संतोष लांडगे करीत आहेत.