ठाणे : मालमत्तेवर नऊ टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या पोखरण रोड येथील निरंजन पोंक्षे (४२) यांना अनिल पाटील आणि हिमेशभाई शहा या दोघांनी दोन लाख १२ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.‘अमरीच क्रिएशन’चे अनिल पाटील आणि हिमेशभाई शहा यांनी संगनमत करून ‘क्लिककाइंड डॉट कॉम’ या संकेतस्थळावर मालमत्तेवर नऊ टक्के दराने कर्ज देण्याची जाहिरात प्रसिद्ध केली. याच जाहिरातीवर ठाण्याच्या पोंक्षे यांनी विश्वास ठेवून या दोघांशी संपर्क साधला, तेव्हा ‘अमरीच क्रिएशन’ कंपनी ही मालमत्ता गहाण ठेवल्यानंतर ९० लाखांपर्यंत थर्ड पार्टी कर्ज देते, असे मोबाइलवर झालेल्या संभाषणातून पाटील यांनी भासवले. त्यामुळे नोंदणी आणि मुद्रांक शुल्कापोटी दोन लाख १२ हजार ४०० रुपये ‘अमरीच क्रिएशन’च्या बँक खात्यामध्ये आॅनलाइन बँकिंगद्वारे भरण्यास त्यांनी भाग पाडले. १९ नोव्हेंबर २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत पोखरण रोड क्रमांक एक, उन्नती गार्डन येथील पोंक्षे यांनी ही रक्कम भरली. अर्थात, त्यांना त्यानंतर कोणतेही कर्ज मिळाले नाही. तसेच त्यांनी भरलेली रक्कमही त्यांना परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी ११ जानेवारी २०१८ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक डी.ई. गोडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अल्प दरात कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील रहिवाशाची दोन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:51 PM
‘क्लिककाइंड डॉट कॉम’ या संकेतस्थळावर मालमत्तेवर नऊ टक्के दराने कर्ज देण्याची जाहिरात प्रसिद्ध करुन ‘अमरीच क्रिएशन’चे अनिल पाटील आणि हिमेशभाई शहा यांनी संगनमताने फसवणूक केली.
ठळक मुद्देसंकेतस्थळावरुन दिली होती जाहिरात मालमत्ता गहाण ठेवून दिले जाणार होते कर्ज नोंदणी आणि मुद्रांक शुल्कापोटी उकळले पैसे