ठाणे : आफ्रिकेमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचे कमी मानधन देऊन सुमारे ११ लाख रुपयांनी फसवणूक करणा-या आयोजकाविरुद्ध पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. छोट्या पडद्यावरील एका हिंदी अभिनेत्रीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.छोट्या पडद्यावर विविध मालिकांमध्ये झळकणारी शिखा सिंग मगन सिंग शाह (३१) या ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक २ वरील निहारिका सोसायटीमध्ये वास्तव्याला आहेत. शिखा सिंग यांच्या तक्रारीनुसार, बोरिवली येथील दीपक चतुर्वेदी यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांना एका कार्यक्रमाची ‘आॅफर’ दिली होती. पश्चिम आफ्रिकेतील घाना येथे हा कार्यक्रम पार पडला. दीपक चतुर्वेदी हे या कार्यक्रमाचे संयोजक असून, त्यांनी या कार्यक्रमासाठी १२ लाख रुपये मानधन कबुल केले होते, असे शिखा सिंग यांनी शनिवारी ठाण्यातील चितळसर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रत्यक्षात कार्यक्रम पार पडल्यानंतर चतुर्वेदी यांनी केवळ ७० हजार रुपये दिले. उर्वरित ११ लाख ३० हजार रुपये देण्यास चतुर्वेदी टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही शिखा सिंग यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून चितळसर पोलिसांनी चतुर्वेदी यांच्याविरुद्ध शनिवारी सायंकाळी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
ठाणे : छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीची फसवणूक, पोलिसांकडे तक्रार : आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:03 AM