- अजित मांडकेठाणे : गेल्या वर्षभरापासून ठाण्यातील विकास कामांना वेग आला असला तरी गांधीनगर पूलाचे काम ८ महिन्यात पूर्ण होणारे मात्र तब्बल सहा वर्ष रखडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे काम अपूर्ण असून सुद्धा पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदाराला कोट्यवधीची बिलही काढण्यात आली आहे. या कामासाठी पालिका अधिकारी मात्र ठेकेदाराला कशी मुदतवाढ देता येईल यामध्ये व्यस्त आहे.
ठाण्यातील पोखरण रोड येथे २०१६ साली रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर येथील मुख्य रस्त्याची रूंदी वाढविण्यात आली. उपवन ते माजिवडा येथील रस्ता ४० मीटर रूंदीचा करण्यात आला आणि या रस्त्याच्या रूंदीकरणासोबत २०१७ ला गांधीनगर येथील पुलाची रूंदी वाढवण्याचे कामही ठाणे महापालिकेने हाती घेतले. ह्या पूलाच्या बांधकामाचे काम अजय पाल मंगल आणि कंपनी या ठेकेदाराला देण्यात आले. साधारण ६ कोटींचे हे काम मंजूर करण्यात आले होते. पण ८ महिन्यात पूर्ण करायचे काम सहा वर्षे रखडल्यामुळे पोखरण रोड २ वर नेहमीच नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे . सकाळी आणि सायंकाळी वर्दळीच्या वेळी तासं-तासं लोकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून रहावे लागत आहे. केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका ठाणेकरांना सहन करावा लागत आहे असा आरोप मनसेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेने २०१७ रोजी ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असूनही ८ महिन्यात पूर्ण होणारे काम गेली सहा वर्षे कागदावरच आहे. मात्र तरीही याबाबत पालिका ठेकेदाराविरोधात कोणतीच कारवाई करत नाही. काम अपूर्ण असूनही पालिकेने मात्र आतापर्यंत या ठेकेदाराला सुमारे ५ कोटींपर्यंत इतकी रक्कमेची देयक मंजूर केले आहेत व त्यातील बहुतेक रक्कम देण्यात देखील आली आहे.ह्या पूलाचे काम अपूर्ण राहण्याला ठाणे महापालिकाच जबाबदार आहे. आठ महिन्यात पूर्ण होणाऱ्या पूलाचे काम सहा वर्षे रखडले तरी पालिका याबाबत कोणतीच कारवाई करत नसल्याचे समोर आले आहे. पूलाचे काम त्वरीत पूर्ण न केल्यास मनसेच्या वतीने संबंधित पालिकेच्या अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करत आंदोलन करण्यात येईल.स्वप्निल महिंद्रकर, शहर अध्यक्ष, मनसेचे जनहित व विधी विभाग