ठाणे - कळवा परिसरात महिलेचा विनयभंग, हाणामारी, ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि धमकावणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या जयप्रकाश प्रल्हाद बिंद (४०, रा. कळवा, ठाणे) या कुप्रसिद्ध गुंडावर ठाण्याचे सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्दतेची कारवाई केली आहे. त्याची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी दिली.
कळव्यातील गुंड जयप्रकाश याच्यावर विनयभंगासह शिवीगाळ करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे आणि धमकी देणे असे सहा गंभीर गुन्हे दाखल झाले होते. याच पार्श्वभूमीवर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी त्याच्या स्थानबद्दतेसाठी एमपीडीए अंतर्गत त्याच्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. याची पडताळणी करुन सह आयुक्त कराळे आणि अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्याखाली २३ मार्च २०२३ रोजी स्थानबद्दतेची कारवाई करुन त्याला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षांसाठी रवानगी केली आहे.
वर्षभरात २६ जणांवर स्थानबद्दतेची कारवाई-ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंग यांनी दहशत निर्माण करणाºया तसेच सक्रीय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २०२२ मध्ये २२ तसेच २०२३ मध्ये आतापर्यंत चार सराईत आणि अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याखाली कारवाई केली आहे. यापुढेही एमपीडीए अंतर्गत स्थानबद्दतेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी िदली.