- जितेंद्र कालेकर
ठाणे - भंडार्ली डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्याला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास निदर्शनास आली. आधी धुमसत असलेली आग रविवारी पुन्हा भडकल्यामुळे सायंकाळी ६ वाजल्यापासून ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलेले नाही. या आगीने रौद्र रूप धारण केल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
ठाणे महापालिकेचे १४ गावातील भंडार्ली येथे डम्पिंग ग्राउंड आहे. डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यात येत नसला तरी येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा डोंगर असून तो हटविण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. डायघर येथील प्रकल्पात सध्या कचरा नेला जात आहे. भंडार्ली येथील कचरा हटविण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. डायघर येथील प्रकल्पात सध्या कचरा नेला जात आहे. भंडार्ली येथील कचरा हटविण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. शनिवारी दुपारी १ वाजता कचऱ्याला आग लागली. धुराचे लोट गावात पसरल्याने ग्रामस्थांनी याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनास दिली. यानंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम करीत आहेत. शनिवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून अद्याप आगीवर नियंत्रण मिळविले गेलेले नाही. रविवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास आगीने पुन्हा रौद्र रूप धारण केल्याने आग आणखी पसरण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. या आगीमुळे धुराचे लोट आजूबाजूच्या गावात पसरून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. आग लागलेल्या ठिकाणाजवळ तबेले असल्याने आग तिथपर्यंत पोहोचू नये, म्हणून ग्रामस्थांकडून खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.