सुरेश लोखंडे
ठाणे : अवघे ४८ रुपये भाडे असलेली शिवशाही वातानुकूलित बस ठाणे ते बोरिवली या मार्गावर नुकतीच सुरू झाली आहे. महापालिकांच्या परिवहन सेवेसह खाजगी संस्थांच्या वातानुकूलित बसच्या तिकिटापेक्षा ५० टक्के कमी भाडे असलेल्या सुमारे १२ शिवशाही बस या मार्गावर धावत आहेत. कमी तिकीटदरामुळे अन्य सर्वच प्रकारच्या बस चालवणा-या संस्थांना यामुळे घाम फुटला आहे. त्यामुळे आपल्या सेवा तोट्यात जाऊ नये, यासाठी त्यांनाही शिवशाहीच्या तुलनेत भाडे करावे लागणार आहे.ठाणे-बोरिवली या मार्गावरील घोडबंदरचा हा परिसर उच्चभू्र लोकवस्तीचा आहे. मुंबईला जाण्यासाठी किंवा ठाणे गाठण्यासाठी कमी तिकीट असलेल्या या वातानुकूलित शिवशाहीला प्रवाशांची अधिक पसंती मिळणे सहज शक्य आहे. सध्या या मार्गावर सहा शिवशाही बस धावत आहेत. एसटी महामंडळाच्या मालकीच्या या बस असून ठाणे विभागासाठी पुन्हा गुरुवारी सहा बस मिळाल्या आहेत. या सर्व म्हणजे १२ बस ठाणे-बोरिवली यादरम्यान धावणार आहेत. ठाणे स्टेशनहून सुटणा-या या बस दिवसभरात १४४ फे-या करणार असल्याचे एसटी महामंडळाच्या ठाणे विभागीय वाहतूक नियंत्रक आर.एच. बांदल यांनी लोकमतला सांगितले.ठाणे ते बोरिवली या मार्गवर सद्य:स्थितीला साध्या चार बस धावत बसून त्या २४ फे-या करत आहेत. या बसचे तिकीट ३३ रुपये आहे, तर निमआराम म्हणजे हिरकणी बसच्या ३६ फे-या होत असून त्यांचे तिकीट ४४ रुपये आहे. तर, सध्या धावत असलेल्या सहा शिवशाहीच्या बसमध्ये पुन्हा सहा बसची भर पडून सुमारे १२ बस या मार्गावर धावणार असून केवळ त्या केवळ ४८ रुपये भाडे आकारत आहेत. आधी त्यांचे तिकीट ५८ रुपये असल्याचे सांगितले जात होते. पण, ते आता ४८ रुपये झाले आहे. या तिकिटावरील १० रुपये आरक्षणकर कमी केल्यामुळे ५८ ऐवजी केवळ ४८ रुपये तिकीट या वातानुकूलित शिवशाहीचे करण्यात आले आहे. या नव्या करकरीत १२ बस या मार्गावर सोडण्याचे नियोजन केल्यामुळे निमआराम म्हणजे हिरकणी बस बंद करण्यात येणार आहेत.*शिवशाहीत सीसीटीव्हीसह मोफत वायफायसंपूर्ण वातानुकूलित असलेल्या या शिवशाहीमध्ये ४४ सीट आहेत. यामध्ये सध्या एलसीडी स्क्रीनची कमी असली तरी पुशबॅक सीट, फायर डिटेक्शन संपे्रशन, मोबाइल चार्जिंग सुविधा, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सेवा व जीपीएस सुविधा असलेल्या या बसच्या प्रवासाकरिता चार व सात दिवसांच्या पासचीदेखील सुविधा आहे. या सोयीसुविधा पूर्ण असलेल्या या बसमध्ये कंडक्टर मात्र नाही. केवळ ४८ रुपये तिकीटदर असलेल्या या शिवशाहीच्या तुलनेत अन्य बसचे तिकीटदर जास्त आहेत. यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटीचा दर ९५ रुपये असून टीएमटीचा ८५ रुपये आहे. बेस्टची प्रवासी सेवा बंद झाली आहे. त्याही ८० रुपये तिकीट आकारत होत्या.महापालिकांच्या या वातानुकूलित परिवहन सेवेप्रमाणेच खाजगी व्होल्वोसाठी १७०, तर उबेरदेखील १९० रुपये भाडे आकारत आहे. यापेक्षा शिवशाहीचा तिकीटदर सुमारे ५० टककयांपेक्षा कमी असल्याचा दावा बांदल यांनी केला आहे. शिवशाही या बस प्रासंगिक करारासाठीदेखील दिल्या जाणार आहेत. लग्न समारंभासाठीही त्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कमीतकमी ३५० किमीच्या प्रवासाकरिता या शिवशाही बस प्रासंगिक करारावर भाड्याने दिल्या जाणार आहेत. यासाठी दोन्ही बाजूंच्या सेवेसाठी सुमारे ५४ रुपये किलोमीटर, तर एका बाजूच्या सेवेसाठी ९४ रुपये किमी भाडे आकारले जाणार असल्याचे बांदल यांनी सांगितले.