- जितेंद्र कालेकर ठाणे - ठाण्यातील तीन हात नाका परिसरात शस्त्र तस्करीसाठी आलेल्या धनंजयकुमारसिंग तारकेश्वरसिंग (२४, रा. मझवालिया, बिहार) याला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांनी शुक्रवारी दिली. त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, चार मॅगझिन आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
तीन हात नाका परिसरात बेकायदेशीर पिस्तूल विक्री करण्यासाठी तस्कर येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली हाेती. त्याआधारे २३ मे २०२४ राेजी दुपारी १:१५ च्या सुमारास सापळा रचून घाेडके यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून तस्करीसाठी आणलेली दाेन देशी पिस्तूल, चार मॅगझिन आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपीविरुद्ध वागळे स्टेट पोलिस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यासह त्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी काेणाला पिस्तूल विक्री करण्यास आला होता, याचा तपास करण्यात येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.