ठाणे : ठाणे शहरातील २५ लाख लोकांकडे २१ लाख ३८ हजार ६७ वाहने आहेत. वाहनांच्या वाढीमुळे शहरातील रस्त्यांवरील वाहनांची गर्दी दरवर्षी आठ ते दहा टक्क्यांनी वाढत आहे. शिवाय, बाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे ठाण्यातील रस्ते वाहतुकीवर ताण पडत आहे. परिणामी, शहरातील काही प्रमुख रस्त्यांबरोबरच इतर रस्त्यांवरील वाहतूककोंडी वाढताना दिसत आहे. ठाण्यात १२ लाख १७ हजार १८३ एवढ्या केवळ दुचाकी असून त्याखालोखाल रिक्षांची संख्या एक लाख १८ हजार ४१९ इतकी आहे. मागील काही वर्षांत त्यामध्ये वाढ दिसून आली आहे.एकीकडे ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने धाव घेत आहे. त्यामुळे काही भागांत रस्ता रुंदीकरण झाले आहे. मात्र, शहरातील रस्ते रुंदीकरण, वाहतूक सर्व्हे, तीनहातनाका येथे ग्रेड सेपरेटरचा केला जाणार प्रयोग, हे आजही कागदावर आहे. मागील कित्येक वर्षांपासून ही कामे पालिकेने हाती घेतली आहेत. परंतु, आजही त्यात पालिकेला यश आलेले नाही. दुसरीकडे शहरातील वाढत्या वाहनांचा ताण सोसण्यापलीकडे झाला आहे. शहराच्या विकास आराखड्याची अद्यापही १०० टक्के अंमलबजावणी झालेली नाही. परंतु, नवनवीन गृहसंकुले उभी राहत आहेत. परिणामी, बाहेरून येणाºया लोढ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. मूलभूत सोयीसुविधांवरही ताण पडल्याचे दिसत आहे.परिस्थिती अशी असताना आता वाहनांच्या संख्येतही मागील काही वर्षांत वाढ होताना दिसत आहे. रस्त्यांची संख्या तेवढीच आहे. रुंदी वाढलेली नाही. शहरातील काही मोजके रस्ते रुंद झाले आहेत. मात्र, इतर रस्त्यांवर वाहनांचा ताण जराही कमी झालेला नाही.१२ लाख १७ हजार १८३ दुचाकींची संख्याशहरात आजच्या घडीला २१ लाख ३८ हजार ६७ वाहने रस्त्यावर धावत आहेत. यामध्ये १२ लाख १७ हजार १८३ दुचाकींची संख्या आहे. त्याखालोखाल चार लाख ५० हजार २५५ चारचाकी अर्थात मोटारींची संख्या आहे.यामध्ये आता रिक्षांच्या संख्येने गरुडझेप घेतल्याचे दिसत आहे. शहरात रिक्षांची संख्याही एक लाख १८ हजार ४१९ एवढी असल्याचे पालिकेच्या पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आले आहे.याशिवाय जीप, स्कूलबस, कंटेनर, ट्रक, ट्रॅक्टर आदींसह इतर वाहनांची संख्याही वर्षाला ८ ते १० टक्क्यांनी वाढताना दिसत आहे. मागील वर्षी शहरात २० लाख ४५ हजार १२४ वाहने होती. त्यात यंदा ९२ हजार ९४३ वाहनांची अधिक भर पडली आहे.
ठाणेकरांकडे २१ लाख वाहने; दरवर्षी १० टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:16 AM