ठाणे : काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात ठाण्यात लसींचा साठा उपलब्ध होत होता. आता ठाण्यात पुन्हा लसींचा साठा संपुष्टात आल्याने ठाणे महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणारी सर्वच लसीकरण केंद्रे बुधवारी बंद ठेवण्यात आली होती. महापालिकेकडे केवळ कोव्हॅक्सिनच्या ३०० लसींचा साठा शिल्लक असल्याने त्यानुसार शहरात बुधवारी पोस्ट कोविड सेंटर येथे दुसरा डोस त्यातून दिला गेला. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करावी, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
ठाणे महापालिकेद्वारे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर लसीकरणाची मोहीमही जोरात सुरू करण्यात आली होती. आता या लसीकरण मोहिमेला दुसऱ्यांदा ब्रेक लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ‘ब्रेक दी चेन’ कशी करायची असा पेच प्रशासनापुढे पडला आहे. मंगळवारी झालेल्या महासभेत आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनीच लसींचा साठा संपला असल्याने बुधवारी शहरातील सर्व केंद्र बंद असतील, असे स्पष्ट केले होते. तर बुधवारी केवळ पोस्ट कोविड सेंटर येथे पहिला डोस घेऊन झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार बुधवारी शहरातील केवळ एकाच केंद्रावर लसीकरण सुरू असल्याचे दिसत होते. त्यातही महापालिकेकडे ३०० डोस हे कोव्हॅक्सिनचे असल्याने त्या शिल्लक साठ्यातून हे लसीकरण बुधवारी सुरू हाेते. कोविशिल्डचा साठा हा पुन्हा संपुष्टात आल्याने आता महापालिकेला लसींच्या पुरवठ्याची वाट पाहावी लागणार आहे. यापूर्वी महापालिकेला अनुक्रमे २० हजार, १८ हजार आणि १४ हजार असा साठा मिळाला होता. त्यानुसार पालिकेने ५६ केंद्रांवर पुन्हा लसीकरण मोहीम सुरू केली होती. आता पालिकेकडे पुन्हा लसींचा खडखडाट झाल्याने बुधवारी शहरातील सर्वच केंद्रे बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर आली होती. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत शहरातील दाेन लाख ५२ हजार ७०७ नागरिकांचे लसीकरण केल्याची माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी शहरात सात हजार २५९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते.
ठाण्यातील आतापर्यंत झालेले लसीकरण
हेल्थ वर्कर, फ्रंटलाइन वर्कर - ६८,०७१
६० वर्षांवरील नागरिक - १,१०,८६२
४५ वर्षांवरील नागरिक - ७३,७७४