मुंबई : रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांवर तसेच पादचारी पुलांवर असणारे फेरीवाले आणि त्यांच्यामुळे गर्दीच्या वेळेत जाता-येता प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि विरोध केल्यास फेरीवाल्यांकडून होणारी दादागिरी ही प्रवाशांना प्रत्यक्षात पाहण्यास व अनुभवण्यास मिळते. यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मध्य रेल्वे आरपीएफकडून नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात फेरीवाल्यांविरोधात विशेष कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १ हजार ४३२ फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा विळखा असलेल्या ठाणे, कल्याण स्थानकांत आरपीएफकडून सर्वाधिक लक्ष केंद्रित करत जादा मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. फेरीवाल्यांच्या स्थानकांना असलेल्या विळख्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. फेरीवाल्यांना विरोध करताच त्यांच्याकडून प्रवाशांवर दादागिरीही केली जाते. त्यामुळे स्थानके फेरीवालामुक्त होणार कधी, असा प्रश्न उद्भवतो. पश्चिम रेल्वे आरपीएफने स्थानके पूर्णपणे फेरीवालामुक्त होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर मध्य रेल्वे आरपीएफने मात्र फेरीवालामुक्त स्थानकांसाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यादृष्टीने जानेवारी महिन्यात विशेष मोहीम हाती घेतली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली आहेत. यातील प्रत्येक पथकात एक अधिकारी आणि चार आरपीएफ जवान सामील आहेत. स्थानकांवर कारवाई करतानाच लोकलमधून विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विशेष मोहिमेद्वारे जानेवारी महिन्यात १ हजार ४३२ जणांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत ५ लाख ३८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे ही कारवाई करताना कर्तव्यात कसूर ठेवणाऱ्या आरपीएफ अधिकारी आणि जवानांवरही कारवाई केली जाणार आहे. यात आतापर्यंत जवळपास ४ आरपीएफ कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात असल्याचे मध्य रेल्वे आरपीएफकडून सांगण्यात आले. यात दोषी आढळल्यास त्यांना दंड आकारला जाईल किंवा अन्य कारवाईचे पर्यायही असल्याचे मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले. फेरीवाल्यांविरोधात सर्व स्थानकांवर कारवाई सुरू आहे. मात्र सर्वाधिक कारवाईसाठी जादा मनुष्यबळ हे ठाणे, कल्याण स्थानकांत तैनात करण्यात आले आहे. या दोन्ही स्थानकांत कारवाईसाठी प्रत्येकी १० जवान तैनात करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
ठाणे फेरीवाल्यांचे आवडते ‘स्थानक’
By admin | Published: February 21, 2017 6:13 AM