ठाणे : आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह माजीवडा येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ठाणे महानगरपालिकेने तीन मजली इमारत जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिली. रविवारी दुपारी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आदीं या इमारतींची पहाणी केली. या वसतिगृहाचे १५ आॅगस्ट या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्या हस्ते उद्घाटन ते लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पोखरण रोड २ येथे ओसवाल पार्कसमोर, उर्वी पार्कशेजारी या वसतिगृहाची तीन मजली ही इमारत आहे. आर्थिकदृष्ट्या मागास मुलांसाठी हे वसतिगृह सुरू होणार आहे. यामध्ये सुमारे ८५ विद्यार्थ्यांर्च्या राहण्याची व्यवस्था आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्यात वसतिगृह आहेत. मात्र आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत ती सोय नव्हती. आता शासनाने वसतिगृह योजना आणली आणि जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली अंमलबजावणी करण्याचे ठरविले.
** या वसतिगृहा कोण प्रवेश घेऊ शकतो!डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेत अल्पभूधारक, शेतमजूर, तसेच वार्षिक आठ लाख रु पये मर्यादेत ज्यांच्या पालकांचे उत्पन्न आहे, अशा विद्यार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश मिळू शकतो. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या विनंतीनंतर ठाणे महानगरपालिकेने वसतिगृहासाठी इमारत उपलब्ध करून देण्यास होकार दिला होता. प्रवेश आदी बाबींसाठी नोडल अधिकारी म्हणून शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य, व समाज कल्याण अधिकारी जबाबदारी पार पाडणार आहेत. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.