जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या दहा वर्षांपासून एकमेकांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी महिनाभरापूर्वीच गुपचूप साध्या पद्धतीने लग्नही केले. कुटूंबियांच्या विरोधामुळे दोघेही विभक्तपणे राहत होते. कुटूंबियांच्या आग्रहाखातर तो दुस-या लग्नाला तयारही झाला. याची कुणकुण त्याच्या पहिल्या पत्नीला लागताच तिने वर्तकनगर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी ऐन हळदीच्या कार्यक्रमातूनच त्याचा हा दुसरा विवाह रोखला आणि दोघींनाही न्याय मिळवून दिला.तो वाल्मीकी समाजाचा. तर ती ख्रिश्चन धर्माची. दोघेही वर्तकनगरच्या भिमनगर परिसरातच वास्तव्याला आहेत. एकमेकांच्या घराजवळच रहायला असल्यामुळे दोघांचीही चांगलीच मैत्री. याच मैत्रितून वयाच्या १६ व्या वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आयुष्यभर एकमेकांनी साथ निभावण्याच्या त्यांनी आणाभाकाही घेतल्या. पण आंतरजातीय असल्यामुळे दोघांच्याही कुटूंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. दोघेही सज्ञान झाल्यानंतर म्हणजे वयाच्या २६ वर्षी म्हणजे अगदी अलिकडे ८ जानेवारी २०१८ रोजी त्यांनी साध्या नोंदणी पद्धतीने विवाह केला. गेल्या दहा वर्षांपासून प्रेमसंबंध असल्यामुळे त्यांच्यात शारीरिक संबंधही होते. केवळ कुटूंबियांच्या विरोधामुळे ते वेगळे राहत होते. इतके सगळे असूनही त्याने पहिलीशी काडीमोड न घेता केवळ कुटूंबियांच्या समाधानासाठी, त्यांच्या आग्रहाखातर तो दुस-याही लग्नाला तयार झाला. मुंबईच्या मुलीचा पाहण्याचा कार्यक्रमही झाल्यानंतर येत्या ९ फेब्रुवारी २०१८ रोजी लग्नाची तारीखही ठरली. अगदी लग्नपत्रिकाही छापल्या गेल्या. ही कुणकुण त्याच्या पहिल्या प्रेमाच्या पत्नीला लागताच तिच्या पायाखालची जमिनच सरकली. तिने वर्तकनगर पोलिसांकडे ५ फेब्रुवारी रोजी या हळदीच्या कार्यक्रमाच्या दिवशीच धाव घेऊन कैफियत मांडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर आणि उपनिरीक्षक सागर भापकर यांनी दुस-यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या नवरोबाला आणि त्याच्या कुटूंबियांना पोलीस ठाण्यात पाचारण केले. याचा आधीच एक विवाह झाला आहे. पहिली पत्नी असतांना दुसरा विवाह करणे बेकायदेशीर आहे. तसे केल्यास फौजदारी कारवाई होऊ शकते. हीच माहिती त्याच्या होऊ घातलेल्या दुस-या पत्नीच्या कुटूंबियांनाही देऊन त्यांचे समुपदेशन पोलिसांनी केले. अखेर दुसरा विवाह मोडल्याचे दोन्ही कुटूंबियांनी जाहीर केले. त्यानंतर त्याने पहिल्या पत्नीशीच एकनिष्ठ राहण्याचे पोलिसांसमोर मान्य केले. दोघेही पुन्हा नव्याने संसाराला लागले. दुसरे लग्न होणार असल्यामुळे पहिलीचा संसार मोडता मोडता वाचला. एका विवाहिताबरोबर लग्न झाले असते तर दुसरीवरही अन्याय झाला असता. त्यामुळे पोलीस ठाण्यात केवळ एक साधी नोंद घेऊन दोघींनाही पोलिसांनी न्याय दिल्यामुळे दोघींच्याही कुटूंबियांनी पोलिसांचे आभार मानले.