- प्रशांत मानेडोंबिवली - रमी सर्कलवरील गेम खेळताना ७० हजार रूपये हरला आणि कर्जबाजारी झाला. हे कर्ज फेडण्यासाठी एकाने चक्क एका वृद्धेच्या गळयातील सोन्याची चैन चोरून पळ काढला. मात्र एका तरूणाने दाखविलेल्या धाडसामुळे संबंधित चोरटा पकडला गेला. नितिन ठाकरे (वय २६) रा. भिवंडी असे चोरटयाचे नाव असून त्याला पकडून पोलिसांच्या हवाली करणा-या सर्वेश राऊत या तरूणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ठाकरे विरोधात विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
डोंबिवली पुर्वेकडील भागात राहणा-या ७० वर्षीय सुवर्णा नेवगी या बुधवारी दुपारी १ च्या सुमारास पश्चिमेला खरेदी निमित्त गेल्या होत्या. तेथून त्या गांधी उदयान परिसरात असलेल्या पश्चिम-पूर्व या पादचारी पूलावरून पूर्वेला येत होत्या. पूलाचा जीना चढत असताना एकजण त्यांच्या जवळ आला आणि त्यांना धक्का देत त्यांच्या गळयातील ६० हजार रूपये किमतीची सोन्याची चैन खेचून पळू लागला. यात सुवर्णा यांच्या गळयाला आणि पायाला दुखापत झाली दरम्यान हा सर्व प्रकार त्याठिकाणाहून जाणा-या सर्वेश राऊत याने पाहिला. त्याने धाडस दाखवित चोरटयाचा पाठलाग केला. काही अंतरावर सर्वेशने त्या चोरटयाला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.
कर्ज कसे फेडायचे या चिंतेत तो होताआरोपी नितिन ठाकरे हा उच्चशिक्षित असून भिवंडीत राहणारा आहे. त्याला रमी सर्कलवर गेम खेळण्याची सवय जडली होती. या खेळात तो ७० हजार रूपये हरला होता. या खेळापायी झालेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेत तो होता. यात त्याने चोरीचा मार्ग निवडला अशी माहीती पोलिस तपासात समोर आली आहे.