ठाणे : ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमाची आखणी केली असून या उपक्रमाचा शुभारंभ लघुउद्योजक क्षेत्रात काम करीत असलेल्या ठाणेकर नागरिकांच्या चर्चेने करण्यात आला.
आगामी आर्थिक वर्षाच्या जुळणीची तयारी आता महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने भविष्यातील योजना, आवश्यकता यांची आखणी केली जात आहे. ही प्रशासकीय स्तरावर निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यात, लोकप्रतिनिधींचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. एखादी समस्या असेल तर तिचा पाठपुरावा करून ती समस्या सोडवण्यासाठी प्रशासनास त्यांचे सहकार्य मिळते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही वेळोवेळी बातम्यांमधून, प्रत्यक्ष भेटून विविध मुद्दे निदर्शनास आणून देतात. त्याच सोबत, नागरिकांची मतेही तसेच प्राधान्यक्रम जाणून घेण्याचीही गरज असते म्हणून हा चर्चेचा उपक्रम सुरू करीत असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
ठाणे शहरात लघुउद्योजकांना व्यासपीठ मिळावे यासाठी ठाणे शहरात एक्झीबीशन सेंटर असणे आवश्यक असल्याचे माया वायंगणकर यांनी नमूद केले. सद्यस्थितीत ठाणे शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या व्यापारपेठा या छोट्या जागेत भरविल्या जातात, जर ठाण्यात एक्झीबिशन सेंटर निर्माण झाले तर सर्वच लघुउद्योजकांना त्याचा फायदा होईल अशी चर्चा यावेळी करण्यात आली. ठाणे शहरात सिडको एक्झीबिशन सेंटरच्या धर्तीवर या ठिकाणी एक्झीबिशन सेंटरचे नियोजन केले जाईल व त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करु असे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.
शहरातील नाले बंदिस्त (कव्हर) करुन त्यावर सोलर सिस्टीम बसविण्याबाबत महापालिकेने विचार करावा असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. नाले कव्हर केले तर डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी सोसायट्या देखील पुढाकार घेण्यासाठी तयार असल्याचे सांगण्यात आले. नाले कव्हर्ड करण्याचे सद्यस्थितीत तरी प्रस्तावित नसल्याचे आयुक्तांनी नमूद केले. ठाण्यातील नोकरी करणाऱ्या नागरिकांना भेडसावत असलेला प्रश्न म्हणजे मुलांचा सांभाळ करण्यासाठी पाळणाघर आणि वृद्ध नागरिकांसाठी वृध्दाश्रम. जर पाळणाघ्र आणि वृध्दाश्रम एकत्रित करण्यासाठी महानगरपालिकेने जागा उपलब्ध करुन दिल्यास या दोन्ही समस्या सुटतील असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच ठाणे महापालिकेच्या शाळांचे आधुनिकीकरण करणे, तसेच या मुलांना स्कील डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देणे, शाळाबाह्य मुलांना शिकविणे असे उपक्रम राबविण्याबाबत महापालिकेने विचार करावा असेही सूचित करण्यात आले. पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे जास्त आहे, त्यामुळे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या तसेच सीबीएससी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेच्या सद्यस्थितीत असलेल्या शाळांचा दर्जा वाढविण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले. शहरातील पार्किंगची समस्याही बिकट असून दिवसेंदिवस ही समस्या वाढणार आहे, यासाठी शहरात पार्किंगची व्यवस्था करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचप्रमाणे रस्त्यावरील फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन उपलब्ध करावेत, उपवन, शिवाईनगर येथे नाना-नानी पार्क नाहीत त्या दृष्टीने विचार करावा. तसेच ठाण्यातील काही स्मशानभूमींमध्ये गैरसोईचा सामना करावा लागतो याबाबतही नागरिकांना योग्य सुविधा मिळतील या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असेही बैठकीत नमूद करण्यात आले.