ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची सुरक्षा लक्षात घेवूनच कारागृहात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद््घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी झाले. ५३ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच अत्याधुनिक कंट्रोल रूम तयार करण्यात येत आहे. ते काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैदी ठेवण्याची क्षमता एक हजार १०० इतकी असताना, सध्या येथे सुमारे तीन हजारांच्या आसपास कैदी आहेत. त्यातच येथे कर्मचारी कमी आणि कैदी जास्त अशी अवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण पडतो आहे. या वाढत्या क्षमतेने या कारागृहाची ओळख ‘कोंडवाडा’ होते आहे. नियमानुसार सहा कैद्यांमागे एक शिपाई असणे आवश्यक आहे. त्यावरून सध्या असणारे कर्मचारी केवळ एक हजार १४० कैद्यांवरच चांगल्या प्रकारे लक्ष ठेऊ शकतात. त्यामुळे उर्वरित कै द्यांचे काय, असा प्रश्न प्रशासनापुढे आ वासून उभा राहिला आहे. त्यातच कारागृहात कैद्यांमध्ये होणाऱ्या हाणामारीच्या घटना, तसेच कारागृहातील अधिकाऱ्यांवर कैद्यांकडून होणे हल्ले आदी बाबी लक्षात घेवून ठाणे कारागृह प्रशासनाने तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, राज्य कारागृह विभागाकडे सुमारे १५० सीसीटीव्ही कॅ मेरे बसविण्याबाबत मागणी लावून धरण्यात आली होती. संबंधित विभागाने सीसिटीव्ही कॅमेरे बसवण्यास हिरवा कंदील दाखवला आणि त्यासाठी ३७ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, कैद्यांसाठी तयार करण्यात येणारे जेवण गरम राहण्यासाठी हॉटपॉटही कारागृहात आणण्यात येणार आहे. जेवण सायंकाळी पाच वाजता तयार होते. मात्र ते वाढायला आठ वाजतात. तोपर्यंत ते थंडे होते. कैद्यांना गरम जेवण मिळावे यासाठी २५ हॉटपॉट दिले जातील असे आश्वासन पालकमंत्र्यांनी उद््घाटन प्रसंगी दिले.(प्रतिनिधी)संपूर्ण कारागृहाच्या दृष्टीने विचार केला तर येथे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज आहे. उर्वरित कॅमेऱ्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे. पण सध्या जे कॅमेरे बसतील, त्यातून कारागृहातील बारीक-सारीक गोष्टीवर लक्ष ठेवण्यास मदत होईल. - नितीन वायचल, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, ठाणे
ठाणे कारागृह सीसीटीव्हीच्या नजरकैदेत
By admin | Published: May 03, 2017 5:37 AM