लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वधू वरासोबत फोटो काढण्यासाठी मंचावर गेलेल्या नवरदेवाच्या आईचेच दागिने लग्नमंडपातून चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील घोडबंदर रोड येथे मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेने पाहुणे मंडळी नाहक संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली.ठाण्यातील घोडबंदर रोड येथील ब्रम्हांड मधील ‘श्रीजी कॉम्प्लेक्स’ येथील रहिवाशी शीतल शर्मा (नावात बदल) यांच्या मुलाचे ३० नोव्हेंबर लग्न होते. या लग्नासाठी घोडबंदर रोड येथील हॉटेल कोर्टयार्ड च्या शेजारी असलेल्या ‘जलसा लॉन’ मध्ये विवाहसमारंभ सुरु होता. रात्री १०.५० ते १०.५५ या दरम्यान लग्न मंचावर वधूवरासोबत फोटो काढण्यासाठी नातेवाईक,मित्रमंडळींनी गर्दी केली होती. त्याचवेळी काही नातेवाईकांनी वधू वरा सोबतचे फोटो काढण्यासाठी नवरदेवाची आई शीतल यांना मंचावर बोलविले. त्या मंचावर फोटो काढण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनी हातातील दागिन्यांची पर्स एका रिकाम्या खुर्चीवर ठेवली. फोटो काढून झाल्यानंतर काही वेळाने त्या पर्स घेण्यासाठी खुर्चीकडे गेल्या. तेंव्हा खुर्चीवर पर्स नव्हती. नातेवाईकांच्या चौकशीतही ती कुठे आढळली नाही. पर्समध्ये ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ९० हजारांची रोकड आणि दोन मोबाईल असा सुमारे दोन लाखांचा ऐवज होता. पर्समधील मोबाईलही नॉट रिचेबल होते. अखेर १ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नवरदेवाची आई शीतल यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.लग्न मंडपातील कॅमे-याच्या फुटेज तसेच लग्नातील व्हिडीओ शूटिंग करणाºयाकडून घटनास्थळाच्या चित्रणाची माहिती घेऊन चोरटयाचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. लवकरच चोरटयाला अटक केली जाईल, असा विश्वास कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी व्यक्त केला आहे.
ठाण्यात नवरदेवाच्या आईचे लग्न मंडपातून दागिने लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 4:39 PM
वधू वरासोबत फोटो काढण्यासाठी मंचावर गेलेल्या नवरदेवाच्या आईचेच दागिने लग्नमंडपातून चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील घोडबंदर रोड येथे मंगळवारी रात्री घडला. या घटनेने पाहुणे मंडळी नाहक संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली.
ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हावधू वरासोबत फोटो काढतांना साधला डाव