लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाची ठाणे शहर नवीन जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यात २५ उपाध्यक्ष, ११ सरचिटणीस (प्रशासन), १० चिटणीस, ३२ सचिव, चारही विधानसभा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, महिला कार्याध्यक्ष आदींसह विविध सेलच्याही नियुक्त्या केल्या आहेत. माजी नगरसेवकांना विशेष निमंत्रितांच्या यादीत समावेश केला आहे. परंतु, मुंब्य्रातील काही माजी नगरसेवकांनी वेगळी चूल मांडल्याने त्यांना यात स्थान देण्यात आले नाही.
ठाणे शहराध्यक्ष असलेले आनंद परांजपे यांनी अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या जागी सुहास देसाई यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी संधी दिली आहे. उपाध्यक्षपदी २५ जणांना संधी दिली आहे. प्रभाकर सावंत, माजी नगरसेवक हिरा पाटील, एकनाथ जाधव यांच्यासह २५ जणांचा उपाध्यक्षांच्या यादीत समावेश आहे.
सरचिटणीसपदी १०, चिटणीस १० आणि ३२ सचिवपदे देण्यात आली आहेत खजिनदारपदी माजी नगरसेवक अमित सरय्या यांची निवड झाली आहे. महिलांची फळी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला आहे. युवक अध्यक्षपदी विक्रम खामकर तर युवक कार्याध्यक्षपदी मयूर शिंदे यांची, पल्लवी जगताप युवती अध्यक्ष यांच्यासह सामाजिक न्याय, ओबीसी सेल पदांवर देखील नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
माजी नगरसेवकांना विशेष निमंत्रितांत संधी
राष्ट्रवादीचे जे शिल्लक आहेत, त्यातील बहुतेकांना विशेष निमंत्रितांत संधी देण्यात आली आहे. यात मनोहर साळवी, मिलिंद पाटील, महेश साळवी, शानू पठाण, माजी युवक अध्यक्ष मंदार केणी यांच्यासह ३८ जणांना विशेष निमंत्रितांत स्थान देण्यात आले आहे.