जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शनिवारी सायंकाळी ५:४५ ते रविवारी सकाळी ७:४० वाजेपर्यंत एकामागून एक असे वेगवेगळ्या कारणांमुळे १८ जणांचे मृत्यू झाले. अवघ्या काही तासांतच हे मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली.
मंत्र्यांसह ठाण्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयात वाॅर्ड फुल्ल झाल्यानंतर अक्षरश: वॉर्डाबाहेर अशा खाटा टाकून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
असा आहे घटनाक्रम
- सायं. ५:४५ वा. : ताप व श्वासाचा त्रास होणारे कोपरीचे सुनील पाटील (५५) यांचा पहिला मृत्यू झाला. - रात्री ९:४० वा. : ९ ऑगस्टला दाखल झालेल्या भानुमती पाढी या ८३ वर्षीय वृद्धेचा युरिनरी इन्फेक्शनमुळे दुसरा मृत्यू झाला. - रात्री १०:४५ वा. : ७ ऑगस्टला शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या गीता यांचा तिसरा मृत्यू झाला. - रात्री १०:३० वा. : १२ ऑगस्टला ताप, श्वासोच्छश्वासाच्या त्रासामुळे आलेल्या भास्कर चाबूकस्वार (३३) यांचा रात्री ११:१५ वाजता मृत्यू झाला. - मध्यरात्री १२:५५ वा. : रॉकेल पिल्यामुळे चेतक गोडे हा चार वर्षीय बालक शहापूरमधून दाखल झाला होता. त्याचा मृत्यू झाला. - मध्यरात्री १:१५ वा. : ९ ऑगस्ट रोजी कल्याणच्या रस्ते अपघातात श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यामुळे दाखल ललिताबाई चव्हाण (४२) यांचा सहावा मृत्यू झाला. - पहाटे २:५३ वा. : १२ ऑगस्टला बेशद्धावस्थेत श्वासाच्या त्रासाने दाखल झालेल्या उल्हासनगरच्या अशोक जयस्वाल (५३) यांचा आठवा मृत्यू झाला. - पहाटे २:५६ वा. : ताराबाई गगे (५६) यांचा नववा मृत्यू झाला. - पहाटे २:५७ वा. : भिवंडीच्या अमरीन अन्सारी (३३) यांचा दहावा मृत्यू झाला. - पहाटे ३:१५ वा. : वागळे इस्टेटच्या सुनीता इंदुलकर (७०) यांचा अकरावा मृत्यू झाला. - पहाटे ३:२६ वा. : नूरजहॉं खान (६०, साकीनाका, मुंबई) यांचा बारावा मृत्यू झाला. - पहाटे ३:३० वा. : एकाचवेळी सनदी मो. हुसैन (६६), निनाद लोकुर (५२), अब्दुल खान (५८, गोवंडी) या ताप आणि श्वासाच्या रुग्णाचा, कल्पना हुमणे (६५, शहापूर) या अपघातातील जखमी महिलेचा अशा चौघांचा मृत्यू ओढवला. - पहाटे ४ वा. : निमोनियाचे रुग्ण भगवान पोतदार (६५, उपवन, ठाणे) यांचा सतरावा मृत्यू झाला. - सकाळी ७:४० वा. : अशोक निचाल (८१) यांचा अठरावा मृत्यू झाला.