ठाणे - नेरूळच्या एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली मध्यस्थांचे अपहरण केले. त्यांच्याकडून खंडणी उकळणारा काँग्रेसचा विद्यार्थी संघटनेचा ठाणे शहर अध्यक्ष प्रथमेश यादव याच्यासह पाच जणांवर कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या टोळक्याने धमकावत ४९ हजार ४८० रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार व्यावसायिक जयेश पटेल यांनी केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
जयेश पटेल (३२) यांचे वडील प्रेमजीभाई पटेल हे सामाजिक कार्य करतात. प्रेमजीभाईचा मित्र चंद्रकांत कांबळे हे राजकुमार वानखेडे याच्यासह दि. २३ ऑगस्ट २०२३ राेजी दुकानात आले. त्यांनी त्यांच्या एका परिचिताच्या मुलीला नवी मुंबईतील नेरूळ येथील मेडिकल कॉलेजमध्ये एमडीसाठी (स्किन) ॲडमिशन करून देण्याचे काम सांगितले. त्यानुसार प्रेमजीभाईंनी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रथमेश यादवशी संपर्क केला. प्रथमेशने अजित ओझा याला संपर्क करण्यास सांगितले. ओझा याने मेडिकल प्रवेशाच्या देणगीसाठी ६७ लाख ५० हजार आणि कमिशन पाेटी दहा लाखांची मागणी केली.
वाराणसी येथून आलेला भाऊ पवनकुमार मिश्रा याच्याशी भेट घालून देण्यासाठी कळंबोली येथे भेटण्याचे ठरले. नंतर मानपाडा, आर मॉल येथे भेटण्याचे ठरले. तेथे अजित ओझा, पवनकुमार मिश्रा, विनीत तिवारी, प्रथमेश यादव आणि विष्णू घाडगे या टोळक्याने नाहक मारहाण केली.