ठाणे - कळवा पश्चिमेच्या इंदिरानगर येथे दरड (भूस्खलन) कोसळली असून ही दरड माँ काली चाळीतील सहा घरांवर शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बरदारी म्हणून तेथील २५ घरे ठाणे महापालिका प्रशासनाने खाली करून तेथील कुटुंबियांना कळव्यातील घोलाईनगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले आहे. ज्या घरांवर दरड कोसळली होती ती घरे रविवारी जमीनदोस्त केल्याची माहिती ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
या दरडीत माँ काली चाळीतील बाबू शेख, सागर चतुर्वेदी, भारती, दशरथ लाल कोरी,अशोक विश्वकर्मा आणि कन्हैया विश्वकर्मा यांच्या घरावर शनिवारी रात्रीच्या सुमारास पडली आहे. घटनेची माहिती मिळताच, कळवा पोलीस,ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी फायर इंजिन आणि क्यूआरव्ही यांना पाचारण केले होते. तसेच या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून घराचे पत्रे फुटल्याने नुकसान झाले आहे. या घटनेमुळे तेथील एकूण २५ कुटुंबियांना तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या शाळेत आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने स्थलांतरित केल्याची माहिती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.