ठाणे : शहरातील उरल्यासुरल्या राष्टÑवादीमधील अंतर्गत खदखद वाढली असून नाराज झालेल्या नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे यांनी शुक्रवार-शनिवारी आपापल्या भागात जोरदार शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली. विशेष म्हणजे मुल्ला यांनी थेट मुंब्य्रात एका शाळेच्या कार्यक्रमालाच हजेरी लावून आमदार जितेंद्र आव्हाड यांनाच थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यामुळे येत्या काळात राष्टÑवादीत मोठा भूकंप होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.पाच दिवसांपूर्वी मुल्ला यांनी स्थायी समितीचा राजीनामा दिल्याने राष्टÑवादीतील अंतर्गत गटबाजीत पुन्हा ठिणगी पडली. मुल्ला यांच्यासह नाराज १० ते १२ नगरसेवक पुन्हा पुढील दोन दिवसांत पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेणार असून गुणात्मक चर्चा व्हावी, अशी मागणी करणार आहेत. परंतु, त्याआधीच मुल्ला आणि जगदाळे यांनी आपली ताकद काय आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दस्तुरखुद्द आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधातच उरलीसुरली राष्ट्रवादी बंडाचे निशाण फडकवण्याच्या तयारीला लागली आहे. जगदाळेंची नाराजी आणि मुल्लांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या असून पक्षात राहून लढावे की वेगळा मार्ग शोधावा, हा प्रश्न घेऊन सक्रिय कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी लोकमान्यनगरात ज्येष्ठ नेते हणमंत जगदाळेंनी बोलावलेल्या बैठकीला गर्दी जमली होती. पक्षातली कोंडी सांगून जगदाळेंनी कार्यकर्त्यांच्या मनाचा कौल घेण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे रविवारी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांचीही बैठक होत असून दोन दिवसांनंतर थेट शरद पवारांशी संवाद साधल्यानंतर या बंडाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती राष्टÑवादीच्या सूत्रांनी दिली.मुल्ला यांनी शनिवारी थेट मुंब्य्रातील एका शाळेच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता, अशी माहिती दिली जात आहे. परंतु, या कार्यक्रमाचे फोटो मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. येत्या काळात मुल्ला हे आव्हाडांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्याचीच मोर्चेबांधणी त्यांनी आतापासून सुरू केल्याची चर्चा आहे.
ताकद आजमावली : नाराज मुल्ला आणि जगदाळेंचे शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 2:52 AM