ठाणे - Ganesh Naik Upset ( Marathi News ) महायुतीकडून ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघासाठी भाजपा आग्रही होतं, परंतु ही जागा आपल्याकडेच ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलं. मात्र नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळताच भाजपात नाराजीनाट्य उफाळून आलं. संजीव नाईक यांना उमेदवारी न मिळाल्याने नाईक समर्थकांनी राजीनामे दिले. त्यामुळे ठाण्यात भाजपा-शिवसेना यांच्यातील दुरावा समोर आला. त्यानंतर या प्रकरणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने दखल घेतली.
पक्षश्रेष्ठींनी गणेश नाईकांची नाराजी दूर केली असून पुढील २ दिवसांत देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपाचा मेळावा पार पडणार आहे. गणेश नाईकांना महायुतीच्या विजयासाठी कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाईक समर्थकांच्या राजीनाम्याचे पडसाद वरिष्ठ पातळीवर उमटले त्यानंतर तातडीने ही नाराजी दूर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नाराज पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या सर्व घडामोडीनंतर आज महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गणेश नाईक आणि कुटुंब उपस्थित राहणार आहे. नाराजांच्या बैठका घेणारे आमदार संजय केळकर हेच नरेश म्हस्के यांच्या उमेदवारी अर्जावरील प्रस्तावक आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, ठाण्यातील नाराजीनाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही एक्शन मोडवर आले आहेत. आज मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत विविध बैठका पार पडणार आहे. ठाणे, कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व असलेला भाग आहे. त्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेची आहे. याठिकाणी कुठल्याही परिस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना पदाधिकारी सक्रीय झालेत. त्यात भाजपा नाराजीमुळे कुठेही महायुतीतील वाद चव्हाट्यावर येऊ नये यासाठी भाजपानेही हालचाली सुरू केल्या आहेत.
ठाणे शिवसेनेकडे जाताच नाईक समर्थकांची नाराजी
ठाणे मतदारसंघ शिवसेनेकडे गेला असून त्याठिकाणी नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र या घोषणेचा पडसाद नाराजीत उमटले. शिंदे गटाने ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याने नवी मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले. संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्याने प्रचंड रोष निर्माण झाला. नवी मुंबईतील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी बोलवलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आपले राजीनामे देण्याची भूमिका घेतली आहे. भाजपाकडून ठाण्यात आधी संजीव नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. भाजपालाच ठाण्याची जागा मिळणार असल्याचेही जवळपास निश्चित झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे संजीव नाईक यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र शिवसेनेनं ठाण्याची जागा आपल्याकडेच ठेवत नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली.