ठाणे - Avinash Jadhav on Naresh Mhaske ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचे नरेश म्हस्के यांना ठाण्यातून उमेदवारी घोषित झाली आहे. या उमेदवारीनंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया आली असून येणाऱ्या ४ जूनला महायुतीचं सरकार या देशात असेल असा विश्वास व्यक्त करत ठाण्यात नरेश म्हस्के यांचा विजय होईल असा विश्वास मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.
मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, नरेश म्हस्के यांचा विजय खूप सोपा आहे. भाजपाचे नगरसेवक, मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व असलेला हा भाग आहे. मागील १० वर्षाचा राजन विचारेंचा कार्यकाळ पाहिला तर मागच्या २ वर्षात ते दिसायला लागले, पहिले ८ वर्ष आम्हाला खासदार शोधावे लागत होते. त्यामुळे ही लढाई कठीण असेल असं वाटत नाही. मनसेची २ लाख मते या मतदारसंघात आहेत. मागच्या विधानसभेची आकडेवारी पाहिली तर २ लाखाच्या आसपास मनसेचं मतदान आहे. त्यामुळे मनसेच्या मतांवर नरेश म्हस्के ठाण्यातून निवडून येतील असं त्यांनी म्हटलं.
तसेच प्रचार किती केला हे महत्त्वाचे नाही, अनेकजण २ वर्ष प्रचार करूनही पडतात. तुल्यबळ काय हे आपण पाहिले पाहिजे. ठाण्यात भाजपा-शिवसेना प्रचंड ताकदीने आहे. त्यासोबत मनसेची २ लाख मते ही महायुतीच्या बाजूने आहेत. त्यामुळे ठाण्यातील विजय एकतर्फी वाटतो असंही मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, पालघरच्या बाबतीत लवकर निर्णय झाला पाहिजे, इतर पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेत, तिथल्या स्थानिक शिवसेनेच्या खासदारांवर लोकांची नाराजी आहे. परंतु याबाबत आज निर्णय होईल. पालघरमध्ये जो कुणी महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासोबत मनसे काम करेल. भाजपा-शिवसेना-मनसे हे ताकदीने पालघरमध्ये प्रचारात उतरणार आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यातील चारही जागा महायुती जिंकेल असा दावाही मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला.