- जितेंद्र कालेकरठाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्याबरोबरच लोकसभेच्या जिल्ह्यातील तिन्ही जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात रविवारी करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमोद हिंदूराव यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी एकमुखाने व एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार करीत विजयाचा एल्गार यावेळी केला.
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या भव्य मेळाव्याला जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष (आठवले), पीआरपी, बविआ, जेएसएस, आरएसपी, पीजेपी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, ब. रि. एकता मंच, रिपब्लिकन पक्ष (खरात), शिवसंग्राम आदी १५ पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या वेळी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी रामभक्ती ही राष्ट्रभक्ती असल्याचे नमूद करीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना श्रीराम प्रतिज्ञा दिली. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मेळाव्याचे नियोजन केले होते.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, ``दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, या महाराष्ट्र गीतातील ओळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात आणायच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास आहे. किसान सन्मान, आयुष्मान भारतसारख्या अनेक सरकारी योजनांमधून जनतेचे जीवनमान बदलले. आतापर्यंत शेतकऱ्यांना २ लाख ८५ हजार कोटी रुपये किसान सन्मानमधून दिले गेले. तर कॉंग्रेसने केवळ ४० हजार कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन अनेक वर्ष कर्जमाफीचे तुणतुणे वाजविले. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला नसता, तर दहा वर्ष ते मुख्यमंत्री राहिले असते. आता विरोधी आघाडीला जागा दाखविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्तयांनी एकदिलाने कार्य करावे.''
येत्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांनी पेलावे, असे आवाहन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात झाली नाही, तेवढी कामे अवघ्या दीड वर्षात झाली. तर ७० वर्षांत न झालेले राम मंदिरासह सर्व प्रमुख कार्य १० वर्षांत झाले आहे, अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीचे कौतुक केले. तर शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पुढील काळात सर्वांनी नमो सैनिक व्हावे, असे आवाहन केले. ठाणे जिल्ह्यातील महायुतीने लोकसभेच्या तिन्ही जागा जिंकाव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले. तर मुरबाड रेल्वे, भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे स्मारक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याची विनंती प्रमोद हिंदुराव यांनी केली. या वेळी महायुतीतील घटक पक्षांचे माजी आमदार आप्पा शिंदे, नामदेव भगत, भास्कर वाघमारे, प्रमोद टाले, गुलाब दुबे यांचीही भाषणे झाली.