ठाणे : ठाण्यातल्या विविध रस्त्यावर धावण्याचा सराव करणारे मेरेथॉन रनर्स व सकाळी फेरफटका मारणाऱ्यांना आता सुरक्षेची हमी हवी आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे मॅरेथॉनचा सराव करणाऱ्या एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर सकाळच्या सत्रात सराव करणारे तसेच फेरफटका मारणारे नागरिक आता एकत्र आले असून त्यांनी या संदर्भात महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना एक पत्र दिले असून किमान सकाळच्या सत्रात विना अडथळा सराव करु शकतील असे काही ठिकाण असावे अशी मागणी केली आहे.
शहरांमध्ये दुदैर्वाने अशी एकही जागा किंवा रस्ता उरलेला नाही जिथे नागरिक आपल्या स्वत:च्या मानसिक व शाररीक स्वास्थ्या करीता ध्वनी व वायू प्रदूषणाला सामोरे न जाता काही वेळ फेरफटका आपल्या कुटुंबीयांबरोबर मारू शकेल. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले,अपंग, गरोदर स्त्रिया यांना रस्त्यावर चालताना येणाºया अनेक अडचणींचा सामना या सर्वांना करावा लागत आहे. जिथे सुदृढ माणसे आपला जीव मुठीत धरून चालत असतात तिथे बाकीच्यांचे काय होत असेल यावर न बोललेच बरे असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. हिरानंदानी इस्टेट, मेडोज, उपवन या परिसरांमध्ये बहुतांशी मॅरेथॉन रनर आपला सराव करताना दिसतात. अशाच प्रकारचा सराव करीत असतांना राजलक्ष्मी विजय यांचा अपघाती मृत्यु झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात आमचा देखील असाच क्रमांक लागू शकतो अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली आहे.
त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वेगाचे उल्लंघन करणे, हॉर्न गरज नसताना वाजविणे (हॉकिंग) अशा अनेक गोष्टींबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची मोहीम वारंवार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जे नागरिक या किमान नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित असल्याचे दक्ष नागरीक महेश बेडेकर यांनी सांगितले. ज्या परिसरामध्ये जास्तीत जास्त नागरिक सकाळच्या प्रहरी फेरफटका व मॅरेथॉन ट्रेनिंगला जातात अशा रस्त्यांवर पोलिसांची गस्त असावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.