अजित मांडके/लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर भागातील मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर अद्याप कोणताच तोडगा न निघाल्याने अखेर ती कारशेडच हलवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. गायमुख येथे प्रस्तावित असलेल्या चौपाटीजवळच पालिकेच्या आणि काही खाजगी भूखंडांच्या आरक्षित जागेवर नवी कारशेड उभी राहील. या जागेची नुकतीच पाहणी झाली आहे. भविष्यात मीरा रोड, दहिसरपर्यंत मेट्रो न्यायची झाल्यास नवी कारशेड उपयुक्त ठरेल, असे एमएमआरडीएचे मत पडले असून त्यासाठी लवकरच या जागेचा सर्व्हे केला जाणार आहे.यापूर्वीच कारशेडसाठी घोडबंदर भागातील कासारवडवली येथील ४० हेक्टर जमीन संपादित करण्याचा निर्णय झाला होता. स्थानिकांना विश्वासात घेऊन ही जमीन संपादित करून तसा ठराव पालिकेने अंतिम मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवावा, असा निर्णय जुलै २०१४ मध्ये झाला होता. महापालिकेने येथील कारशेडची जागा आरक्षित करण्यासाठी हिरवा कंदील दिला असला, तरी यापैकी १० हेक्टर जागा शहरांतर्गत प्रस्तावित असलेल्या मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या कारशेडसाठी मिळावी, असा ठराव केला होता. तो शासनपातळीवर गेल्यानंतर एमएमआरडीएने त्याला विरोध दर्शवून तेथील संपूर्ण जागेची मागणी केली होती. जागा ४० हेक्टर असली तरीदेखील प्रत्यक्षात किती जागेची गरज आहे, किती जण बाधित होणार आहेत, आदिवासींची जागा घेणे शक्य आहे का? या सर्वच बाबींचा विचार झाला होता. नंतर तेथील सर्व्हेही पूर्ण करण्यात आला. सर्व्हेच्या दिवशी काही शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यात साधारणत: २० ते २५ शेतकरी बाधित होणार होते. पण त्यांचा विरोध डावलून सर्व्हे पूर्ण करण्यात आला. परंतु, त्यानंतर राष्ट्रवादीने थेट कारशेडची जागाच बदलावी, अशी मागणी केली होती.आता त्या कारशेडच्या जागेचा प्रस्ताव बासनात गुंडाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. गायमुख येथील प्रस्तावित चौपाटीजवळच नवे कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या जागेसाठी एमएमआरडीएने पालिकेला पत्र दिले आहे. या जागेची संयुक्त पाहणीदेखील करण्यात आली आहे, तेथील काही जागा पालिकेची आणि काही खाजगी आहे. तसेच पालिकेच्या एचटीपी प्लांटचीही जागा आहे. परंतु, हा प्लांट येथेच राहणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. एमएमआरडीएची मिळाली पसंतीपाहणीनंतर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी या जागेला पसंती दिली असून या जागेवर कोणत्याही प्रकारे नव्या इमारतींना परवानगी देऊ नये, अशा आशयाचे पत्र दिले आहे. तशी खबरदारी पालिकेने घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.
ठाणे मेट्रोचे कारशेड गायमुखला!
By admin | Published: July 03, 2017 6:31 AM