- अजित मांडके ठाणे - ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावरील प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात मनसेने आता एल्गार सुरू केला आहे. मनसेने शनिवारी आनंदनगर प्रवेशद्वारासमोर समोर साखळी आंदोलन करत प्रस्तावित टोल दरवाढ रद्द करावी अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या प्रश्नी आता मनसेच्या वतीने सलग तीन दिवस आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सध्या स्थितीत रस्त्याची देखभाल करत नसून रस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरण करण्यात आले आहेत. तर एकूण असलेल्या ५५ पूलांपैकी फक्त १३ पूल एमएसआरडीसी प्राधिकरणाच्या वतीने देखभाल केले जाते. त्यामुळे प्राधिकरण जर देखभाल करत नसेल तर त्यांच्यामार्फत टोल वसुल करणे चुकीचे आहे. याचबरोबर ही टोल वसुली गेल्या १३ वर्षांपासून सुरू असून या कालावधीमध्ये वाहनांची प्रचंड संख्या वाढली असून याबाबत अधिकृत आकडेवारी प्राधिकरणाच्यावतीने घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार २० किलोमीटर अंतराच्या कक्षात येणाऱ्या नागिरकांच्या वाहनासाठी टोल सवलत देणे बंधनकारक असून ती दिली जात नाही. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने टोल नाका तसेच पूलांवरील जाहिरातींच्या पैशांची वसुली मोठ्या प्रमाणात केली जात असून त्याची कुठेचे नोंद होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.
या रस्त्यांच्या केलेल्या कामांपैकी बहुतेक काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले असल्याने त्याची वसुली ठाणेकरांकडून करणे अन्यायकार असल्यामुळे शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली नवीन धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार आनंद नगर येथे प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर अध्यक्ष रवींद्र मोरे ,जनहित व विधी विभाग शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर, पुष्कराज विचारे ,सुशांत सूर्यराव, दिनकर फुल्सुंदर,समीक्षा मार्कंडेय यांच्यासह ठाणेकर नागरिकांनी या जाचक टोलवाढीतून सुटका मिळावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात आले आहे. या साखळी उपोषणाद्वारे या आंदोलनाची सुरूवात झाली असून सलग तीन दिवस हे आंदोलन करण्यात येणार आहे. टोलमुक्तीचे केवळ आश्वासन – गेल्या दहा वर्षापासून एमएसआरडीसी तसेच एमएमआरडीए दोन्ही प्राधिकरण मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत आहेत. तरीही ठाणेकरांना साधी टोल सवलत देखील देण्यात आलेली नाही. २०१४ ला मुख्यमंत्री यांनी ठाणेकर नागरिकांना टोल मुक्तीचे आश्वासन दिले होते, पण अद्यापही त्याची अमंलबजावणी झालेली नाही. सत्तेत नसताना टोलच्या वसुलीमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली त्याची पुढे काय कारवाई झाली याबाबतची माहितीही लोकांपर्यंत पोहचलेली नाही.
रविवारी होणार ठाणे शहरात चौक आंदोलन:प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात पुढच्या टप्प्यात म्हणजेच रविवारी ठाणे शहरातील विविध चौकांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत ही टोल दरवाढ रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे मनसेचे अविनाश जाधव यांनी सांगितले