ठाणे : एमएमआरडीएकडून कोपरी रेल्वे ब्रीजचे काम शनिवारी रात्री ११ ते रविवार, दि. २३ मे रोजी सकाळी ६ या काळात सुरू राहणार आहे. त्यामुळे या काळात ठाणे मुंबई हा पूर्व द्रूतगती महामार्ग सात तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात अन्य पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे.
कोपरी रेल्वे ब्रीजच्या कामासाठी ज्ञानसाधना कॉलेज आणि कोपरी पूर्व या मार्गाला जोडणारा पथवे ब्रीज काढण्यात येणार आहे. त्या कामासाठी मोठी क्रेन मागविण्यात आली आहे. त्यामुळे कोपरी ब्रिजवरून मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई अशी दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. त्यासाठी ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या मार्गावर राज्याबाहेर आणि राज्यांतर्गत वाहनांची वर्दळ असते. या वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
*मोठ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग-नाशिक-मुंबई महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंंबईकडे जाणाऱ्या अवजड (ट्रक, ट्रेलर आदी) वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने खारेगाव टोलनाका येथून गॅमन चौकमार्गे पारसिक रेती बंदर मुंब्रा बायपास येथून रबाले, ऐरोली ब्रीजमार्गे मुंबईत जातील.
* त्याचवेळी घोडबंदर महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांनी माजीवडा ब्रिजवर उजवे वळण घेण्यास तसेच गोल्डन क्रॉस ब्रिजखाली प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने तत्त्वज्ञान सिग्नल पुढे माजीवडा ब्रिजवरून खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन पारसिक रेती बंदरमार्गे रबाले, ऐरोली ब्रिजमार्गे मुंबईत जाणार आहेत.
* लहान वाहने- मोटारकारसारख्या लहान वाहनांनाही नौपाडा सर्व्हिसरोड महालक्ष्मी मंदिरसमोरून कोपरी ब्रिजकडे जाण्यासाठी प्रवेश बंद राहणार आहे. त्याऐवजी या वाहनांना साकेत येथून डावीकडे वळण घेऊन साकेतरोड, क्रिकनाका डावीकडे वळण घेऊन शिवाजी चौक, कळवा विटावामार्गे ऐरोली येथून मुंबईत जावे.
* ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने जिल्हा मध्यवर्ती कारागृहरोड येथून विटावा, ऐरोलीमार्गे मुंबईत जातील. घोडबंदररोड आणि ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी लहान वाहने ही तीनहात नाका येथून मॉडेला चेक नाकामार्गे मुंबईत जाणार असल्याचे वाहतूक शाखेने म्हटले आहे.
............
वाचली