ठाणे - मागील काही महिन्यापासून सुरु असलेला भाजपा अर्थात मिलिंद पाटणकर आणि महापालिका प्रशासन यांच्यातील वाद अखेर संपुष्टात आला आहे. दुरुस्तखुद्द मुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्ती केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी यात दुव्याची भुमिका बजावल्याचेही माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांना देण्यात येणारी वादाची बुलेट देखील मार्गी लागली आहे. मागील दोन महिन्यापासून ठाणे महापालिकेत विरोधी पक्षाची भुमिका राष्ट्रवादी ऐवजी भाजपाकडून बजावली जात होती. दोन महिन्यापूर्वी ठाणे महापालिकेने पोलिसांना बुलेट देण्याचा प्रस्ताव पटलावर आणला होता. याच मुद्यावरुन भाजपाच्या नगरसेवकांनी तसेच इतर पक्षातील नगरसेवकांनी देखील याला विरोध दर्शविला होता. सत्ताधारी पक्षाने देखील या प्रस्तावाच्या विरोधात भुमिका घेऊन हा प्रस्ताव नामंजुर केला होता. परंतु असे असतांना देखील प्रशासनाने मागील महासभेत हा प्रस्ताव तहकुब असल्याचे सांगत पुन्हा पटलावर आणला होता. त्यामुळे या प्रस्तावाच्या विरोधात भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी सभा तहकुबी मांडली होती. महासभेत देखील यावरुन गोंधळ झाला होता, त्यानंतर वेळेअभावी ती महासभा तहकुब झाली होती. त्यानंतर २८ फेबु्रवारीला पुन्हा महासभा लागली. यावेळी पहिल्या सत्रात पाटणकर गैरहजर राहिले होते. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ते हजर होते. परंतु ते हजर असतानाही बुलेट मात्र सुसाट निघाली. एकूणच अचानक बुलेटचा वाद शमला कसा अशी चर्चा मात्र सुरु झाली होती.दरम्यान, या वादावर पडदा टाकण्याचे काम दुरुस्तखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही मुख्यमंत्र्यांकडे हे पाटणकरांची चर्चा करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी मधल्या दुव्याचे काम केल्याची माहिती भाजपाच्या सुत्रांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत आयुक्तांबरोबर समेट करण्याची भुमिका घेतली जावी असे पाटणकरांना सांगण्यात आले. तसेच विरोधाला विरोध झालाच पाहिजे अशी भुमिका देखील ठेवली जाऊ नये अशी देखील चर्चा झाली. एकूणच मुख्यमंत्र्यांनी भाजपा आणि आयुक्त यांच्यातील वाद संपुष्टात आणल्याची माहिती समोर आली आहे.या संदर्भात भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी मात्र याबाबत इन्कार केला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. चर्चा काय झाली हे मात्र सांगू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय पोलीस उपायुक्तांनी देखील आपल्याला फोन करुन बुलेटचा प्रस्ताव मंजुर करावा अशी विनंती केली होती. त्यामुळे आपण अखेर माघार घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे महापालिका आयुक्त आणि भाजपाचे गटनेते पाटणकर यांच्यातील वादावर अखेर मुख्यमंत्र्यांनी घडविली समेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 6:11 PM
ठाणे महापालिका आयुक्त आणि भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांच्यातील वादावर अखेर मुख्यमंत्र्यांनी पडदा टाकण्याचे काम केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयुक्त आणि पाटणकर यांच्यात समेट झाली आहे.
ठळक मुद्देबुलटेचा प्रस्तावही लागला मार्गीमुख्यमंत्र्यांनी बजावली मध्यस्तीची भुमिका