ठाणे :
कळवा खाडीतील कांदळवन नष्ट करणा:या अनाधिकृत झोपडय़ांवर अखेर महापालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार दुपार्पयत ५२ झोपडय़ा तोडण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली. या कारवाईला रहिवाशांनी विरोध केला मात्र पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी तहसील विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
खाडीलगत गेल्या अनेक वर्षांपासून बेसुमार बांधकामे झाली असून यामुळे खाडीचे अस्तित्वच आता धोक्यात आले आहे. या ठिकाणी शेकडो बांधकामे उभी राहिली असून त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. खाडी किनारी अनधिकृतपणे उभे राहिलेल्या या झोपड्यांच्या संदर्भात कोकण विभागीय कार्यालयात एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये खाडीपात्रात खारफुटीची कत्तल करून उभ्या राहिलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्याकडे देखील एका बैठक होऊन कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर सोमवारी सकाळ पासूनच ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाणे महापालिकेच्या वतीने संयुक्तपणे या कारवाईला सुरुवात करण्यात आली. जुन्या ब्रिटिश कालीन कळवा उड्डाण पुलाच्या खाली, पोलीस आयुक्तालयाच्या समोर असलेल्या खाडीपात्रात ही कारवाई करण्यात आली. दुपार पर्यंत ५२ झोपड्यांवर कारवाई करण्यात आली अशी माहिती ठाणे पालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे. कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. त्यामुळे काही प्रमाणात विरोध झाला तरी यामुळे कारवाईत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही.